चार वर्षांपूर्वी भारतात बदल घडवण्याच्या उद्देशाने आम्ही प्रवासाला सुरुवात केली. या चार वर्षांमध्ये विकासाला एका चळवळीचे रुप प्राप्त झाले. भारताच्या या विकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे मोलाचे योगदान आहे. सरकारवर विश्वास दाखवणाऱ्या जनतेसमोर मी नतमस्तक होतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

केंद्रातील मोदी सरकारला शनिवारी चार वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशवासियांचे आभार मानले. ते म्हणाले, २०१४ मध्ये याच दिवशी आम्ही भारतात बदल घडवण्यासाठी कामाला सुरुवात केली. गेल्या चार वर्षांत विकासाला एका चळवळीचे रुप प्राप्त झाले. प्रत्येक भारतीयाने या विकास यात्रेत योगदान दिले. १२५ कोटी भारतीयांनी भारताला नव्या उंचीवर नेले. मोदी सरकारवर विश्वास दाखवणाऱ्या देशवासीयांसमोर मी नतमस्तक होतो, असे त्यांनी सांगितले. तुमचा पाठिंबा आणि प्रेम यामुळे आम्हाला प्रोत्साहन आणि शक्ती मिळते. आम्ही यापुढेही अशाच पद्धतीने जनतेची सेवा करत राहू, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मोदींनी एक व्हिडिओ देखील ट्विटरवर शेअर केला आहे. या तीन मिनिटांच्या व्हिडिओत सरकारने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे.