विधानसभा निवडणुकींमुळे पश्चिम बंगालमधील राजकारण चांगलच तापलं आहे. भाजपाने याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन रॅलीचं आयोजन केलं आहे. भाजपाकडून मागील बऱ्याच काळापासून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर त्यांच्या भाच्याच्या नावाने टीका केली जात आहे. याच टीकेला आज ममता यांनी थेट आव्हान देतच उत्तर दिलं आहे. ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जींच्या नावाने होणाऱ्या टीकेवरुन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिलं आहे.

नक्की वाचा >> अमित शाह म्हणतात, “ममता बॅनर्जींंना सत्तेपासून दूर करणं हे आमचं ध्येय नाही, तर…”

पश्चिम बंगालमध्ये भाजपाने अनेकदा अभिषेक बॅनर्जींवरुन ममतांवर निशाणा साधाला आहे. ममतांवर घरणेशाहीचा आरोप करण्यापासून अभिषेक यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप लावण्यापर्यंत अनेक प्रकारे भाजपाकडून बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. अभिषेक बॅनर्जींवरुन तोलाबाज भाईपो म्हणजे खंडणीखोर भाचा अशा अर्थाचा टोला भाजपा नेत्यांकडून अनेकदा लगावला जातो. याच टीकेला आता ममता यांनी उत्तर दिल्याचे पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार म्हटलं आहे. “मी अमित शाह यांना आव्हान करते की त्यांनी आधी अभिषेक बॅनर्जींविरोधात लढून दाखवावं आणि नंतर माझ्याशी लढावं,” अशा शब्दांमध्ये ममता यांनी शाह यांना खुलं आवाहन दिलं आहे.

कोण आहेत अभिषेक बॅनर्जी आणि त्यांनी मोदींना काय आव्हान केलं आहे?

अभिषेक बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपाला राजकारणामधील घारणेशाहीविरोधात कायदा आणण्याचं आव्हान दिलं होतं. केंद्र सरकारने जर एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला राजकारणामध्ये प्रवेश करता येईल असा काही कायदा आणला तर मी लगेच राजकारण सोडून देईन, असं अभिषेक यांनी म्हटलं होतं. तसेच माझ्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईल, असंही म्हटलं होतं.  डायमंड हार्बर मतदारसंघातून खासदार असलेल्या अभिषेक यांनी भाजपातील घराणेशाहीवर टीका केली होती. “कैलाश विजयवर्गीय यांच्यापासून शुभेन्दु अधिकारींपर्यंत आणि मुकुल रॉय यांच्यापासून ते राजनाथ सिंह यांच्यापर्यंत भाजपा नेत्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य भाजपाच्या महत्वाच्या पदांवर आहेत. जर एका कुटुंबातील एकच सदस्य सक्रीय राजकारणामध्ये असण्याबद्दलचा कायदा केला तर तृणमूल काँग्रेस पक्षाकडून केवळ ममता मॅनर्जी राजकारण असतील, असा मी शब्द देतो,” असं अभिषेक म्हणाले होते.

आम्हाला गर्व आहे की ममता बॅनर्जींनी…

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शनिवारी व्हिक्टोरिया मेमोरियलमधील घटनेचा संदर्भ देत बॅनर्जी यांनी जय श्री रामच्या घोषणा मुद्दाम देण्यात आल्या. ममता यांनी भाषण देऊ नये म्हणून या घोषणा करण्यात आल्या, असा आरोपही अभिषेक यांनी केला होता. “आम्हाला गर्व आहे की ममता बॅनर्जींनी सरकारी कार्यक्रमामध्ये अशाप्रकारे घोषणा देऊन नेताजींचा अपमान करण्याऐवजी त्याविरोधात आम्ही उभे राहिलो. बंगाल याला विरोध करण्यासाठी उभा राहिला,” असं अभिषेक बॅनर्जी म्हणाले होते. “तुम्ही मंदिरांमध्ये, धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपल्या घरात हजारवेळा जय श्री रामच्या घोषणा द्याव्यात. मात्र जो कार्यक्रम नेताजींच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले त्यामध्ये अशाप्रकारे सरकारी व्यासपीठासमोर घोषणा देणं चुकीचं आहे,” असंही अभिषेक बॅनर्जी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी एकाच मंचावर असतानाच जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्याने ममता यांनी भाषण देण्यास नकार दिल्याने झालेल्या वादामध्येही अभिषेक बॅनर्जी आक्रामक झाल्याचे पहायला मिळालं होतं.