“भाजपाची दारं माझ्यासाठी उघडली गेली हे माझं भाग्य आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिता शाह आणि जे. पी. नड्डा यांचे आशीर्वाद लाभले आहेत. मी स्वतःला भाग्यवान समजतो” अशी प्रतिक्रिया भाजपा प्रवेश केलेले नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. भोपाळ येथे भाजपा कार्यालयात ते आले होते. त्यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तुम्ही सगळे एक आहात, आम्ही तुमच्यात एक म्हणून आलो आहोत. आता १ आणि १ दोन नाही ११ झाले पाहिजेत असंही वक्तव्य शिंदे यांनी केलं.

आजचा दिवस हा माझ्यासाठी एक भावनिक क्षण आहे. ज्या पक्षात आणि ज्या कुटुंबीयांसह मी २० वर्षे घालवली, ज्या पक्षासाठी आणि कुटुंबासाठी कष्ट उपसले तो पक्ष ते कुटुंब मी मागे सोडून आलो आहे. आज मी स्वतःला तुम्हा सगळ्यांना अर्पण करतो आहे. अशी भावनिक सादही त्यांनी भोपाळ येथील जनतेला घातली.

काँग्रेस पक्षाने माझ्यावर हवी ती टीका करावी. मी काहीही बोलणार नाही, कारण त्या पक्षासाठी १८ वर्षे मी माझी निष्ठा वाहिली आहे. त्यांना जे काही बोलायचे आहे ते बोलू द्या मी त्यांना उत्तर देणार नाही. मी त्या पक्षासाठी दिलेलं योगदान हेच त्यांच्या टीकेचं उत्तर आहे असंही ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे.