पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घसरत चालेल्या लोकप्रियतेवरुन लक्ष वळवण्यासाठी माओवाद्यांनी त्यांच्या हत्येचा कट आखल्याचा बनाव रचण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस आणि केंद्र सरकारने संगनमताने मिळून हे कारस्थान रचले आहे असा आरोप गुजरातच्या वडगाम विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केला आहे.

ज्याने कोणी शहरी नक्षलवाद हा शब्द शोधून काढला तो शहरी मूर्ख असल्याचे मेवाणी म्हणाले. ते इंडिया टुडेशी बोलत होते. जेव्हा कधी मोदींची लोकप्रियता कमी होऊ लागते तेव्हा त्यांच्या हत्येचा कट रचल्याच्या बातम्या येऊ लागतात. मोदींना सहानुभूतीची गरज का लागते ? असा सवालही मेवाणी यांनी विचारला आहे. आता महाराष्ट्र पोलिसांनी दिल्लीशी संगनमन करुन माओवादी कारस्थानाचा हा बनाव रचला आहे असे मेवानी म्हणाले. आपल्यावरही उमर खालिदसारखा गोळीबार होऊ शकतो अशी भिती त्यांनी बोलून दाखवली.

रोजगार निर्मितीच्या आघाडीवर मोदी अपयशी ठरले असून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही उपायोजना नाही असे मेवाणी म्हणाले. पोलिसांकडे असलेले पत्र कारस्थान रचल्याचा पुरावा ठरु शकत नाही. मी तुम्हाला पत्र लिहू शकतो. पत्रांची मालिका चालवू शकतो त्याला काही तर्क आहे का ? नक्षलवाद किंवा आरएसएस कोणाकडूनही केल्या जाणाऱ्या हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही ते चुकीचेच आहे असे मेवाणी म्हणाले.

महाराष्ट्र पोलिसांवर कारवाईची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

मानव हक्क कार्यकर्ते, विचारवंत आणि सिव्हील सोसायटीच्या सदस्यांवर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईचा गुरुवारी दिल्लीत विविध समाजिक कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. तसेच राजकीय सुडभावनेचे राजकारण ताबडतोब थांबवा आणि महाराष्ट्र पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली.

सिव्हील सोसायटीचे सदस्य असलेल्या लेखिका अरुंधती रॉय, ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भुषण, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय आणि आमदार जिग्नेश मेवाणी आदींनी दिल्ली प्रेस क्लबमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी ही मागणी केली. तसेच बेकायदा अटकेची कारवाई करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांचे जप्त केलेले लॅपटॉप आणि मोबाईल फोन्सही पोलिसांनी परत करावेत अशी मागणीही करण्यात आली.