विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय व तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज(सोमवार)एक घोषणा केली. या पुढे आता पश्चिम बंगालमधील सगळे पत्रकार देखील करोना योद्धे असणार आहेत.

”मी सर्व पत्रकारांना कोविड योद्धा असं घोषित करते.” असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माध्यमांसमोर जाहीर केलं आहे. याशिवाय आज मध्य प्रदेश सरकारने देखील सर्व मान्यताप्राप्त पत्रकरांना फ्रंट लाईन वर्कर घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, कालच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी देखील, श्रमिक पत्रकारांना फ्रंटलाईन कोविड वॉरियर्स म्हणून घोषित केलं आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या की, मी सर्व कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे व कोणत्याही प्रकारच्या हिंसेत सहभागी न होण्याचे आवाहन करते आहे. आपल्याला माहिती आहे की भाजपा व केंद्रीय सुरक्षा दलांनी आपल्याला किती त्रास दिला आहे. सध्या आपण करोनाविरोधात लढत आहोत.

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने अक्षरशा धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली.