मुंबईवरुन कंगना रणौत आणि शिवसेनेत जोरदार टिकाटिपण्णी सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगनाला वाय प्लस सुरक्षा देऊ केली आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामना या वृत्तपत्रातून केंद्रावर निशाणा साधताना कंगनावर पुन्हा एकदा तिखट शब्दांत टिपण्णी केली होती. यावर कंगना मूळची ज्या राज्याची रहिवासी आहे त्या राज्याचे मुख्यमंत्री अर्थात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री श्री जयराम ठाकूर यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेची मूळं आता संपली आहेत, अशा शब्दांत त्यांनी सेनेवर टीका केली आहे.

आणखी वाचा- मुंबईत पोहोचताच कंगनाची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाली…

ठाकूर म्हणाले, “मला सामनाबद्दल बोलायचं नाही, कारण मी हे वृत्तपत्र वाचलेलं नाही. पण शिवसेनेची मूळं आता संपली आहेत. कारण ज्या ध्येयाने शिवसेनेचा जन्म झाला होता ते त्याचं ध्येय राहिलेलं नाही. काँग्रेससोबत सत्तेत आल्यानंतर त्यांची स्थिती काँग्रेससारखी बनली आहे. आपली सत्ता सुरक्षित रहावी यासाठी शिवसेना अशा प्रकारची वक्तव्य करीत आहे.”

आणखी वाचा- कंगनाच्या ‘बाबर सेना’ला संजय राऊतांचं उत्तर; बाबरी पाडणारे आम्हीच आहोत

सामनातून कंगना रणौत आणि केंद्र सरकारवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, “हिंदुत्व आणि संस्कृत धर्म तसेच मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अपमान करण्यात आला. तसेच हा अपमान करुन छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावर नशेची पिचकारी उडवणाऱ्या व्यक्तीला केंद्र सरकारने विशेष सुरक्षेच्या पालखीचा सन्मान दिला आहे. राजकीय अजेंडा समोर आणण्यासाठी देशद्रोही पत्रकार आणि सुपारीबाज कलाकारांना राजद्रोहाचं समर्थन करणे देखील हरामखोरी आहे.”