आघाडीचे हलाहल अर्थात विष काय असते ते मला समजले आहे आणि ते मी पचवतोय.. असे म्हणत अश्रू ढाळणाऱ्या कुमारस्वामींनी आता आपल्या वक्तव्यावरून यू टर्न घेतला आहे. तो जेडीएसचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात मी भावना विवश झालो आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले. मात्र प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला असे सांगत आपण काँग्रेसबद्दल काही बोललोच नव्हतो असे म्हटले आहे.

आघाडी सरकारच्या वेदना काय असतात हे मला ठाऊक आहे. मी भगवान शंकराप्रमाणे हलाहल अर्थात विष पचवतो आहे असे वक्तव्य कुमारस्वामी यांनी बेंगळुरू येथे झालेल्या कार्यक्रमात केले होते. त्यावर त्यांना रडूही कोसळले. यानंतर कुमारस्वामींवर चौफेर टीकाही झाली. भाजपानेही कुमारस्वामींवर निशाणा साधला. या सगळ्या गदारोळानंतर आणि टीकेनंतर कुमारस्वामी यांनी आपण असे बोललोच नाही असे म्हणत सरळ सरळ आचार्य अत्रेंच्या तो मी नव्हेच या नाटकातील लखोबा लोखंडे या काल्पनिक पात्राप्रमाणेच पवित्रा घेतला आहे.

सोमवारीच भाजपाने कुमारस्वामी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार बहाल करत आहोत असा टोला लगावला होता. तसेच केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनीही त्यांना मिस्टर बेचारा म्हणत त्यांच्यावर टीका केली. काँग्रेसने कुमारस्वामी यांच्यासोबत तेच केले जे काँग्रेसने एच. डी देवेगौडा, चंद्रशेखर, आय. के. गुजराल यांच्यासोबत केले अशीही टीका जेटली यांनी केली होती. तसेच कुमारस्वामी यांच्या रडण्याचीही खिल्ली उडवली होती.

इतके सगळे झाल्यावर कुमारस्वामी यांची प्रतिक्रिया समोर आली. त्यांनी या सगळ्या वादाचे खापर चक्क प्रसारमाध्यमांवर फोडत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याची सारवासारव केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.