11 August 2020

News Flash

नरेंद्र मोदींना माझा पाठिंबा, पण अमित शहांना विरोध: ममता बॅनर्जी

देशात हुकूमशाहीचे वातावरण

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (संग्रहित छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेलक्या शब्दात टीका करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या एका विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नरेंद्र मोदींना माझा पाठिंबा असला तरी मी अमित शहांच्या विरोधात आहे असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. यानिमित्ताने ममता बॅनर्जींनी आता मोदींचे धोरण स्वीकारल्याची चर्चा सुरु झाली असून विरोधकांच्या गोटात मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), नोटाबंदी अशा विविध मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ममता बॅनर्जींनी टीकेची झोड उठवली होती. मात्र एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ममता बॅनर्जींनी मोदींविरोधात नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसले. बॅनर्जी म्हणाल्या, मी मोदींचे समर्थन करते, पण अमित शहांना माझा विरोध आहे, मी पंतप्रधानांना जबाबदार ठरवत नाही. मी त्यांना का जबाबदार ठरवावं?,  पण त्यांच्या पक्षाने जबाबदारीने वागले पाहिजे असे त्यांनी सांगितले. देशात हुकूमशाहीचे वातावरण असून एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष (अमित शहा) सरकारी कामात हस्तक्षेप करत आहे असा दावा त्यांनी केला.

ममता बॅनर्जींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे कौतुक केले. ‘वाजपेयीदेखील भाजपचे नेते होते. पण ते संतुलित आणि निष्पक्ष नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला कधीच अडचणींचा सामना करावा लागला नाही असे त्या म्हणाल्यात. विद्यमान सरकारमधील समस्यांसाठी बॅनर्जींनी मोदींऐवजी भाजपला जबाबदार ठरवले.

मुलाखतीमध्ये ममता बॅनर्जी या वारंवार अमित शहांना लक्ष्य करत होत्या. ‘पक्षाचा अध्यक्ष केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतो. ही हुकूमशाहीच आहे, पक्षाचा अध्यक्ष मंत्र्यांची बैठक कशी घेऊ शकतो. पंतप्रधान कोण आहे?, मोदी की शहा असा सवालच त्यांनी उपस्थित केला. ममता बॅनर्जींनी मोदींचे धोरण स्वीकारल्याचे संकेत दिले असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर मोदींचे समर्थन केल्याने विरोधकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

‘विरोधी पक्षांमध्ये आता एकजूट झाली असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात बदल होईल. सहा महिन्यांसाठी प्रतीक्षा करा, सर्व चित्र स्पष्ट होईल’ असेही बॅनर्जींनी म्हटले आहे. केंद्र सरकारवर कोणी टीका केल्यास ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचे पथक त्यांच्या घरात पोहोचते असा आरोप त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2017 11:18 am

Web Title: i dont blame pm favour narendra modi not amit shah says west bengal cm mamata banerjee
Next Stories
1 पहा व्हिडिओ : लडाखमध्ये भारतीय सैनिकांवर चिनी सैनिकांनी केली होती दगडफेक
2 भाजप खासदार मनोज तिवारींवर हल्ला, थोडक्यात बचावले
3 संयुक्त जनता दल ‘रालोआ’मध्ये
Just Now!
X