माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकीर्दीवर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. मात्र, या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट आम्हाला दाखवा अन्यथा मध्यप्रदेशात तो प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा मध्यप्रदेशातील काँग्रेस नेते सय्यद जफर यांनी दिला आहे. मात्र मुख्यमंत्री कमलनाथ यांनी चित्रपटावर बंदी आणण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे. यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये आपापसात समन्वय नसल्याची चर्चा सुरु आहे.

मध्य प्रदेशात नुकतंच काँग्रेसचं सरकार आलं असून कमलनाथ मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. मध्य प्रदेशात चित्रपटावर बंदी आणण्यात आल्याची चर्चा सुरु होती. मात्र जनसंपर्क मंत्रालयाने ट्विट करत सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं सांगितलं आहे. बंदी घातल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं सांगत फेटाळण्यात आलं आहे.

काही प्रसारमाध्यमांनी मध्य प्रदेशात चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचं वृत्त दिलं होतं. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद निर्माण झाला असून काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

काँग्रेस नेते सय्यद जफर यांचा विरोध –
‘चित्रपटाचे शीर्षक आणि ट्रेलरमध्ये जे काही दाखवण्यात आलं त्याला आमचा विरोध असून दिग्दर्शकांना मी याविषयी पत्र लिहिलं आहे. चित्रपटाच्या आशय तपासण्यासाठी आम्हाला तो प्रदर्शनापूर्वी दाखवावा, अन्यथा आम्ही राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही,

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काही काळ त्यांचे माध्यम सल्लागार असलेले संजय बारू यांनी लिहीलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकावर याच नावाचा चित्रपट तयार करण्यात आला आहे. यात मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदाची धुरा सांभाळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे सांगण्यात आले आहे. बारू यांचे पुस्तक बाजारात आल्यानंतरही त्याची यामुळे बरीच चर्चा झाली होती. आता त्यावर थेट दृश्य स्वरुपातील चित्रपटच येणार असल्याने त्याच्या प्रदर्शनापर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. पुढील वर्षी ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होत आहे.