भाजपा भलेही काँग्रेसमुक्त भारतची घोषणा देत असलं तरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मात्र आपल्याला भाजपामुक्त भारत नको असल्याचं म्हटलं आहे. मी त्यांच्याशी लढणार आणि त्यांचा पराभव करणार असं राहुल गांधी बोलले आहेत. सध्या काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्ष कर्नाटकमध्ये जोरदार प्रचार करत असून राहुल गांधी यांनी डेक्कन हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.

राहुल गांधी बोलले आहेत की, ‘तुम्ही पाहिलं असेल की नरेंद्र मोदी माझ्याबद्दल आणि इतर काँग्रेस नेत्यांबद्दल आक्षेपार्ह टीका करत असतात. मी नेहमीच त्यांच्या पदाचा सन्मान करत आलो आहे. मला तुम्ही कधीही त्याप्रकारची भाषा वापरताना पाहणार नाही. मला भाजपामुक्त भारत नको आहे’. यावेळी राहुल गांधी यांनी कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काही बोलत आहेत त्याची नकारात्मक प्रतिक्रिया उमटत असल्याचं म्हटलं आहे. गुजरातमध्ये ज्या प्रकारचं वातारवण होतं, तसंच कर्नाटकमध्ये झालं आहे. संपूर्ण देशभरात असं वातावरण आहे असं राहुल गांधी बोलले आहेत.

नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये अनेक आश्वासन देत सत्ता मिळवली होती. यामध्ये रोजगार, भ्रष्टाचार रोखणं आणि शेतकरी मुद्दे महत्वाचे होते. मात्र ही तिन्ही आश्वासनं पुर्णपणे फोल ठरली आहेत. सुरुवातीला त्यांनी गुजरातच्या जनतेला फसवलं, नतंर देशाला आणि आता कर्नाटकची वेळ आहे अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

याआधी एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी आपण काही झालं तर नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका करणार नसल्याचं म्हटलं. ‘ते माझ्याबद्दल काही बोलले तरी मी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करणार नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत. पण मी त्यांना प्रश्न विचारु शकतो’, असं राहुल गांधी बोलले.