भारतीय बँकाकडून घेतलेले तब्बल ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याने गुरूवारी अजब दावा केला. आज इंग्लंडच्या वेस्टमिन्सटर कोर्टात प्रत्यापणासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीसाठी विजय मल्ल्या कोर्टात हजर झाला होता. खटल्याची सुनावणी संपवून बाहेर आल्यानंतर विजय मल्ल्याला पत्रकारांनी घेरले. मुंबई उच्च न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटबद्दल, तुमचे म्हणणे काय आहे, असा सवाल मल्ल्याला विचारण्यात आला. मल्ल्याने या प्रश्नावर मला काहीच बोलायचे नसल्याचे म्हटले. त्यानंतरच्या प्रश्नांनाही मल्ल्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्यानंतर एका महिला पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर मल्ल्याने मौन सोडले. तुम्ही भारतीय न्यायालयापासून पळत का आहात? तुम्ही त्या ठिकाणी सुनावणीसाठी हजर का राहत नाही? तुम्ही भारताला अनेक कोटींचे देणे लागता त्याचे काय?, अशी प्रश्नांची सरबत्ती या महिला पत्रकाराने केली. तेव्हा मी इंग्लंडमध्ये १९९२ पासून राहत आहे, असे सांगत मल्ल्याने अप्रत्यक्षपणे आपण भारतीय न्यायालयापासून पळत नसल्याचे सूचित केले. दरम्यान, प्रत्यापर्णाच्या या खटल्याची पुढील सुनावणी १४ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

गेल्याच महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विजय मल्ल्याविरोधात मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. २००९ मध्ये किंगफिशर एअरलाईन्सला बँकेने ९०० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. एअरलाईन्स तोट्यात असताना हे कर्ज देण्यात आले होते. ईडीच्या तपासणीत बँकेतील माजी अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. नियम शिथील करुन कर्ज दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र या अधिकाऱ्यांविरोधात ईडीला कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. किंगफिशर आणि बँकेच्या अधिकाऱ्यांमधील आर्थिक हितसंबंध उघड झालेले नाही असे सूत्रांकडून समजते. ईडीने आरोपपत्रात विजय मल्ल्याला मुख्य आरोपी म्हटल्याची शक्यता असून ९०० पैकी ६०० कोटी परदेशात गुंतवण्यात आले. तर ३०० कोटी भारतात गुंतवल्याचे समोर आले होते. त्यापूर्वी ब्रिटनच्या न्यायालयाने ४ डिसेंबरपर्यंत मल्ल्याला जामीन मंजूर केला होता. सुनावणीसाठी आलेल्या विजय मल्ल्याने न्यायालयाबाहेर निर्दोषत्व सिद्ध करण्याइतका भक्कम पुरावा असल्याच्या वल्गनाही केल्या. वेस्टमिन्स्टर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली होती.

भारत-पाक सामन्याचा विजय मल्ल्यालाही ‘मोह’, स्टेडिअममध्ये उपस्थिती