केरळ विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार म्हणून क्रिकेटपटू एस. श्रीशांत याला उमेदवारी देण्याची योजना भाजपने आखली आहे. याबाबतचा निर्णय बुधवापर्यंत घेण्याचे श्रीशांतने म्हटले आहे.
याबाबतचा निर्णय बुधवारी जाहीर करू इतकेच वक्तव्य करून श्रीशांतने सविस्तर भाष्य करण्यास नकार दिला. दिल्लीतील भाजपच्या उच्चपदस्थ नेत्याकडून श्रीशांतला दूरध्वनी आला आणि थ्रिपुन्नीथुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची विनंती करण्यात आली, असे श्रीशांतच्या कुटुंबीयांनी सांगितले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे केरळ भेटीवर येणार असून त्या वेळी श्रीशांत त्यांची भेट घेणार असल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.
याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. राजशेखरन यांना विचारले असता त्यांनी या गोष्टीची कल्पना नसल्याचे सांगितले. येत्या एक-दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. श्रीशांतने होकार दर्शवल्यास त्याचा मुकाबला राज्याचे अबकारीमंत्री आणि काँग्रेसचे नेते के. बाबू यांच्याशी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.