भारतीय जनता पार्टीचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना यांनी आपल्याला पाकिस्तानातून वारंवार धमक्या येत असल्याचे म्हटले आहे. आजही आपल्याला कराचीतून फोनवरुन धमकी आल्याचा दावा त्यांनी गुरुवारी केला.


रैना म्हणाले, आपल्याला धमक्या येत असल्याची तक्रार आपण संबंधीत विभाग आणि राज्यपालांकडे केली होती. गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला वारंवार धमक्या येत आहेत. आजही पाकिस्तानातील कराचीतून आपल्याला धमकीचा फोन आल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपाने जम्मू-काश्मीर सरकारमधून पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर काही दिवसांनी रैना यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा सुरु आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी पक्षाचा निर्णय जाहीर केला होता. केंद्र सरकार दहशतवादाविरोधात आवश्यक ती सर्व मदत करीत असतानाही मेहबुबा मुफ्ती सरकार काश्मीरमधील दहशतवादी कारवाया रोखण्यात अपयशी ठरल्याने त्यांचा पाठिंबा काढून घेत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

त्यानंतर पीडीपीला राज्यातील कोणत्याही पक्षाने पाठींबा न दिल्याने नवे सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे राष्ट्रपतींच्या आदेशाने येथे आता राज्यपाल राजवट लागू होणार आहे. कालच मुख्य सचिवपदी राज्यपाल एन. एन. वोहरा यांनी वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी बीव्हीएस सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली.