केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे अहंकारी नेते असल्याची टीका नक्वी यांनी केली आहे. देशात जे काही आहे ते काँग्रेसनेच केले असल्याचा दावा राहुल करत असतात. आता फक्त ब्रह्मांड, समुद्र आणि पृथ्वी याची निर्मितीही काँग्रेसनेच केले आहे, हेच म्हणणे बाकी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मी माझ्या जीवनात आतापर्यंत इतका अहंकारी व्यक्ती कधी पाहिलेला नाही. देशात जो काही विकास झाला आहे, तो काँग्रेसनेच केला असल्याचे राहुल नेहमी सांगत असतात, असे ते म्हणाले.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांसाठी राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. प्रचारसभेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत आहेत. त्यामुळे भाजपा नेत्यांकडून पलटवार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, शनिवारी राहुल गांधी यांनी छत्तीसगड येथील प्रचारसभेत मोदींना राफेल मुद्यावर खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. अंबानी, एचएएल आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावर चर्चा करु असे ते म्हणाले, संरक्षणमंत्र्यांनीही हा पंतप्रधानांचा निर्णय असल्याचे म्हटले होते. सीबीआयच्या संचालकांना रात्री २ वाजता हटवले. ते माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत.