महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे बुधवारी ईव्हीएमच्या मुद्यावरून भेट घेतल्यानंतर, माध्यमांना त्यांनी या भेटी विषयी थोडक्यात माहिती दिली . तसेच, ईव्हीएमच्या मुद्यावर आपल्याला उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, व निवडणूक आयुक्तांकडून कोणतीच अपेक्षा नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आपण निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराच्या मुद्यावरून भेट घेण्यासाठी आलो होतो. याशिवाय मी त्यांना मुंबईतील एका मोर्चासाठी देखील आमंत्रित केले आहे. त्यांचा पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगत, मै हू, ऐसा समझ लेना.. असे म्हटले असल्याचेही राज यांनी सांगितले.

या भेटीमध्ये निवडणूक सुधारणा, मतपत्रिकेद्वारे मतदान व राजकीय परिस्थिती यासारख्या विषयावर चर्चा झाली असल्याचीही माहिती समोर आली आहे. या महिन्याच्या सुरूवातीस देखील राज यांनी याच मुद्यावरून यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची देखील दिल्लीत भेट घेतली होती. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर आणा अशी मागणी राज ठाकरेंनी या अगोदर केलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जे आंदोलन होणार आहे, त्याची तयारी आता राज ठाकरे यांनी सुरु केली असल्याचे दिसत आहे.