विधानसभा निवडणुकीदरम्यान लोकांना पूर्ण जनादेश मागितला होता. पण ते मिळाले नाही. त्यामुळेच आज आपण काँग्रेसच्या कृपेवर अवलंबून आहोत, असे स्पष्टीकरण कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी कृषी कर्ज माफ करण्यास आपले प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. जर मी कर्ज माफ करण्यात असफल ठरलो. तर मी आपल्या पदाचा राजीनामा देईल, असेही ते म्हणाले.

माझ्या पक्षाने एकट्याने सरकार बनवलेले नाही. मी लोकांना जनादेश मागितला होता. मी कोणाच्याही दबावात न येण्यासाठी जनादेश मागितला होता. पण आज मी काँग्रेसच्या कृपेवर आहे. मी राज्यातील साडेसहा कोटी लोकांच्या दबावात नाही.

माझ्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. याचाच अर्थ मतदारांनी मला आणि माझ्या पक्षाला नाकारले आहे. मी पूर्ण बहुमत देण्याची मागणी केली होती. मी शेतकरी नेत्यांची वक्तव्ये ऐकली आणि त्यांनी मला किती पाठिंबा दिला हेही पाहिले. नेता म्हणून माझ्याही काही मर्यादा आहेत. तरीही कृषी कर्जमाफीबाबत माझे धोरण स्पष्ट आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही माझी प्राथमिकता आहे. तुम्ही एक आठवडा वाट पाहू शकत नाही ? अजून कॅबिनेटची स्थापना पण झालेली नसल्याचे त्यांनी भाजपाचे नाव न घेता म्हटले.

दरम्यान, भाजपाने कर्जमाफीसाठी सोमवारी एक दिवसाचा बंद पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी कर्जमाफीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला आघाडीतील काँग्रेसचीही सहमती घ्यावी लागणार आहे.