इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या आयोजनासंदर्भात आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. तसेच, सुत्रांच्या माहितीनुसार केंद्राकडून राज्यांसमोर परीक्षेसंबधी दोन पर्याय ठेवण्यात आले व ही परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय झाला असून, जुलै महिन्यात ही परीक्षा होण्याची शक्यता आहे.

याबाबत रमेश पोखरियाल यांनी माहिती देताना सांगितले आहे की, “ बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत अन्य राज्यांसोबतची बैठक फलदायी ठरली. कारण, आम्हाला अत्यंत महत्वपूर्ण सल्ले मिळाले. मी राज्य सरकारांना २५ मे पर्यंत आपल्या विस्तृत सूचना पाठवण्यास सांगितले आहे. यामुळे आम्ही इय़त्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात एका निर्णयापर्यंत पोहचण्यात सक्षम होवू आणि विद्यार्थी व पालकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी त्यांना आपल्या निर्णयाबाबत लवकरच सूचित करू. विद्यार्थी व शिक्षक दोघांचीही सुरक्षा आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे.”

तसेच, केंद्र सरकारने बारावी बोर्डाच्या परीक्षेसंबधी राज्यांसमोर दोन पर्याय ठेवले असून, केवळ महत्वाच्या विषयांची परीक्षा घेणे किंवा परीक्षा पद्धत बदलणे. हे ते दोन पर्याय असल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर राज्यांच्या बोर्डांना आपला निर्णय घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

करोनाची दुसरी लाट चालू असताना लांबणीवर टाकण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांबाबत आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची महत्त्वाची बैठक  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली.

बारावीच्या परीक्षांबाबत आज केंद्रीय स्तरावर बैठक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. तर, विविध राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांचा यामध्ये सहभाग होता.  पोखरियाल यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक व इतरांकडून समाजमाध्यमातून त्यांचे म्हणणे मागवले होते.

सुत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीचा अहवाल पंतप्रधान कार्यालाकडे पाठवला जाईल. त्यानंतर ३० मे रोजी पुन्हा एकदा राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक होण्याची शक्यता असून, त्यानंतर केंद्र सरकार परीक्षेबाबत आपला निर्णय जाहीर करेल.

राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा होणार की नाही? शिक्षणमंत्र्यांनी मांडली भूमिका!

गेल्या महिन्यात राज्य सरकारने महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बारावीच्या परीक्षा मात्र घेतल्या जातील असं देखील सांगितलं होतं. सीबीएसई बोर्डानं देखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे एकूणच राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत नेमकं काय होणार? या संभ्रमात विद्यार्थी आणि पालकही असताना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.