घसरलेल्या जीडीपीवरून सध्या मोदी सरकार विरोधकांच्या टीकेचं धनी ठरलं आहे. जीडीपीचे आकडे जाहीर झाल्यापासून सरकारल घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असून, काँग्रेसचे नेतेही मोदी सरकारच्या धोरणांचा समाचार घेताना दिसत आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही नरेंद्र मोदी यांना त्यांचं २०१३ मधील एक ट्विट दाखवत टीका केली आहे.

करोना संकटापूर्वी देशाची अर्थव्यवस्था मंदावल्याची आकडेवारी समोर येत होती. त्यातच करोना आणि लॉकडाउननं अर्थव्यवस्थेवर मोठं संकट ओढवलं. त्याचे परिणाम दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जीडीपीच्या आकड्यातून दिसून आला. देशाचा जीपीडी चार दशकात पहिल्यांदा इतका घसरला आहे.

अनेक क्षेत्रातील उत्पादन घटलं असून, रोजगारनिर्मितीवरही परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. घसरलेल्या जीडीपीवरून आता विरोधक मोदी सरकारवर आक्रमकपणे टीका करताना दिसत आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० नोव्हेंबर २०१३ रोजी ट्विट केलं होतं. त्या ट्विटकडे चिदंबरम यांनी मोदींचं लक्ष वेधलं आहे. त्याचबरोबर “मलाही आदरणीय पंतप्रधानांना हेच सांगायचं आहे,” असं म्हणत टीका केली आहे.

२०१३ मध्ये मोदींनी नेमकं काय ट्विट केलं होतं?

२०१३ मध्ये केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए-२ सरकार अस्तित्वात होतं. तर पंतप्रधान होते डॉ. मनमोहन सिंग. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था व रोजगारासंदर्भात एक ट्विट केलं होतं. “अर्थव्यवस्था संकटात आहे. तरुणांना रोजगार हवायं. शुल्लक राजकारण करण्यापेक्षा अर्थशास्त्राला जास्त वेळ द्या. चिदंबरमजी, हातांना रोजगार देण्याकडे लक्ष द्या,” असं मोदी म्हणाले होते.