पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाने आपले पाय बळकट करण्यास सुरूवात केली आहे. बंगालमध्ये आज आणि शनिवारीही भाजपाचा झंझावात दिसून आला. बंगालच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शनिवारी तृणमूल काँग्रेस व सीएएममधील ११ आमदारांनी व एका माजी खासदाराने भाजपात प्रवेश केला. या महाभरतीनंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला होता. दरम्यान, आज अमित शाह यांच्या रोड शो ला मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती. असा रोड शो आपण यापूर्वी कधी पाहिला नाही, लोकांना आता परिवर्तन हवंय, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. रोड शो पूर्वी अमित शाह यांनी रविंद्रनाथ टागोर यांना आदरांजलीही वाहिली.

“आजपर्यंत मी अनेक रोड शो पाहिले आहेत किंवा केलेही आहेत. परंतु असा रोड शो आयुष्यात मी कधी पाहिला नाही. या रोड शोमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबातच विश्वास आणि प्रेम दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या लोकांना आता परिवर्तन हवं आहे हे आता सिद्ध झालं आहे. निवडणुकांमध्ये सत्ता ही भाजपाकडे देण्याचा निश्चय जनतेनं केला आहे. ममता बॅनर्जींविरोधात आता लोकांमध्ये राग आहे,” असं अमित शाह यावेळी म्हणाले.

रोड शो दरम्यान अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला. “आगामी निवडणुकांमध्ये पुतण्याची दादागिरी संपवण्यासाठी परिवर्तन होणार आहे. बांगलादेशी घुरखोरांना हटवण्यासाठी परिवर्तन होणार आहे. आता लोकांनी या ठिकाणी परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हा केवळ कोणत्या व्यक्तींचं होणारं परिवर्तन नाही. हे परिवर्तन पश्चिम बंगालच्या विकासासाठी होणार आहे. तसंच ते घुसखोरी रोखण्यासाठी, राजकीय हिंसाचार संपवण्यासाठी होणार आहे,” असं शाह म्हणाले.