पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी(दि.23) न्यू-यॉर्क येथे भेट झाली. या भेटीपूर्वी ट्रम्प आणि इम्रान खान यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

एका प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प यांनी, “रविवारी ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात 59 हजार लोकांच्या जनसमुदायासमोर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत आक्रमक विधान केलं”, असं म्हटलं. ट्रम्प म्हणाले की, “भारताकडून, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काल अत्यंत आक्रमक विधान  ऐकलं…मी तिथेच उपस्थित होतो. अशाप्रकारचं विधान ऐकायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं. तिथे उपस्थित लोकांना ते विधान आवडलं पण ते अत्यंत आक्रमक विधान होतं”.

नरेंद्र मोदी यांनी रविवारी ह्यूस्टनमध्ये हाउडी मोदी कार्यक्रमात पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला होता. “ज्यांना स्वतःचा देश सांभाळता येत नाही त्यांना(पाकिस्तानला) भारताने घेतलेल्या निर्णयांवर (काश्मीरबाबत) आक्षेप आहे. ते दहशतवाद्यांना पोसतात, दहशतवाद्यांना पाठिंबा देतात. अमेरिकेतील 9/11 हल्ला असो किंवा मुंबईतील 26/11 हल्ला, या हल्ल्यांचे षड्यंत्र रचणारे कुठे सापडले? हे लोक कोण आहेत हे फक्त तुम्हालाच नाही, संपूर्ण जगाला ठाऊक आहे”. असं मोदी म्हणाले होते.

यानंतर पुढे बोलताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची तयारी दर्शवली. “प्रत्येक समस्येचं निराकरण असतंच आणि ही समस्याही लवकरच सोडवली जाईल. भारत आणि पाकिस्तान एकत्र येतील आणि दोघांसाठी चांगलं घडेल असं काहीतरी करतील अशी अपेक्षा आहे”, असं ट्रम्प म्हणाले. भारत-पाकिस्तान दोन्ही देशांची सहमती असेल तर काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थीसाठी तयार असल्यांचही ते यावेळी पुन्हा म्हणाले. “जर मला मध्यस्थतेसाठी विचारण्यात आलं तर मी तयार आहे. मध्यस्थता करायला मला नक्कीच आवडेल, हा एक क्लिष्ट विषय आहे. दोन्ही देशांची तयारी असेल तर मध्यस्थीसाठी मी तयार आहे. पण भारताने यासाठी तयारी दर्शवणं देखील आवश्यक आहे. असं ट्रम्प म्हणाले. यानंतर, काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याबाबत एक प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला. त्यावर, सर्वकाही लवकर सुरळीत व्हावं अशी इच्छा असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं.