वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी देशभरातील ३ हजार ८४२ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेसाठी १५ लाख ९७ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८५ ते ९० टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. मात्र बिहारमधील दरभंगा येथील संतोष कुमार यादव याला ही परीक्षा देता आली नाही. २४ तास प्रवास करुन ७०० किमीचे अंतर कापून संतोष बिहारमधूल कोलकात्यामध्ये असणाऱ्या त्याच्या परीक्षा केंद्रावर पोहचला. मात्र १० मिनिटं उशीर झाल्याने त्याला परीक्षेला बसू दिलं नाही. पूर्व कोलकात्यामधील सॉल्ट लेक सेंटर येथील शाळेत असणाऱ्या परीक्षा केंद्रावर संतोषला प्रवेश नाकरण्यात आल्याने अवघ्या १० मिनिटांसाठी संतोषचे संपूर्ण वर्ष वाया गेलं आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

“परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांना मी प्रवेश देण्यासंदर्भात विनंती केली. मात्र त्यांनी मला प्रवेश दिला नाही. परीक्षा दुपारी दोन वाजता सुरु झाली. मी १ वाजून ४० मिनिटांनी केंद्रावर पोहचलो होतो. मात्र दीड वाजण्याच्याआधी केंद्रावर विद्यार्थ्यांनी हजर रहावे असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे मला प्रवेश नाकारण्यात आला,” असं संतोषने स्थानिक वृत्तवाहिन्यांना सांगितलं. १० मिनिटांसाठी माझं संपूर्ण वर्ष वाया गेलं अशी खंतही संतोषने व्यक्त केली. करोनासंदर्भातील नवीन नियमांमुळे तपासणीसाठी लागणारा वेळ वगैरेचा विचार करता विद्यार्थ्यांनी पेपरच्या तीन तास आधी परीक्षा केंद्रावर यावे असे आदेश जारी करण्यात आले होते. “मी दरभंगावरुन शनिवारी सकाळी आठची पहिली बस पकडली. मी तिथून मिर्झापूरला पोहचलो. त्यानंतर मी पटण्याला जाण्यासाठी दुसरी बस पकडली. मात्र वाहतुककोंडी असल्याने मला सहा तास उशीर झाला. त्यानंतर शनिवारी रात्री नऊ वाजता मी दुसरी बस पकडली. या बसने मी रविवारी दुपारी कोलकात्यामधील सिल्दा स्थानकावर उतरलो. मी एक वाजून सहा मिनिटांनी उतरलो आणि टॅक्सीने परीक्षा केंद्रावर आलो,” असं संतोषने आपल्या २४ तासांहून अधिक वेळ केलेल्या प्रवासाची माहिती देताना सांगितलं.

या प्रकरणावर शाळेतील परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र एवढे पैसे आणि वेळ खर्च करुन आल्यानंतरही या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू न दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.