मी माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या तर मी गद्दार कसा काय झालो असा प्रश्न आता ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी उपस्थित केला आहे. मी एक भारतीय आहे. या देशाबद्दल मला जे प्रश्न पडले आहेत ते मी उपस्थित केले त्यात माझे काय चुकले की मला गद्दार ठरवले जाते आहे? असाही प्रश्न नसीरुद्दीन शाह यांनी विचारला आहे. या देशात गायीच्या मृत्यूचे महत्त्व पोलिसाच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे असे म्हणत नसीरुद्दीन शाह यांनी खंत व्यक्त केली होती. उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं.

एवढंच नाही तर ‘देशातील हे वातावरण पाहता मला माझ्या मुलाची चिंता वाटते. कारण त्यांचा कोणता धर्म नाहीये. आम्ही आमच्या मुलांना धर्माची शिकवण दिली नाही. कारण चांगलं किंवा वाईट याचं धर्माशी काही देणंघेणं नाही असं मला वाटतं. काय योग्य, काय अयोग्य हे माझ्या मुलांना मी शिकवलं आहे. उद्या माझ्या मुलांना एखाद्या जमावाने घेरलं आणि तुमचा धर्म कोणता असं विचारलं तर ते काय उत्तर देणार याची मला चिंता वाटते. कारण त्यांच्याकडे कोणतंच उत्तर नसेल.’ ही वक्तव्ये समोर आल्यानंतर नसीर म्हणत आहेत की मी जे बोललो ते पोटतिडकीने बोललो मग मला गद्दार का ठरवलं जातं आहे? या देशावर माझे प्रेम आहे, माझे घर आहे. मी जे प्रेमापोटी बोललो तो माझा गुन्हा आहे का? असेही नसीर यांनी विचारले आहे.