केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेवरून केलेल्या त्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले की, मी प्रादेशिक भाषांवर हिंदी भाषा लादण्याचे कधीच म्हटले नाही. मी केवळ एवढेच म्हटले की मातृभाषेनंतर दुसऱ्या भाषेच्या रूपात हिंदी शिकायला हवी. मी स्वतः गैर हिंदी भाषिक राज्य असलेल्या गुजरातचा आहे, जर काहीजणांना यावरून राजकारण करायचं असेल तर हा त्यांचा निर्णय आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्या हिंदी भाषेबद्दल केलेल्या विधानावरून मागील काही दिवसात मोठे वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. हिंदी दिवसाचे औचित्य साधत गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदीद्वारे संपूर्ण देश जोडण्याचे म्हटले होते. अमित शाह यांनी म्हटले होते की, विविध भाषा आपल्या देशाची ताकद आहेत. मात्र आता देशाला एका भाषेची आवश्यकता आहे, जेणेकरून या ठिकाणी परदेशी भाषांना स्थान मिळू शकणार नाही. तसेच त्यांनी यावेळी हिंदीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याबाबतही म्हटले होते.

विशेष म्हणजे गृहमंत्री शाह यांच्या विधनानंतर दक्षिण भारतातील भाजपा नेत्यांकडूनही आवाज उठवण्यात आला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी देखील शाह यांच्या हिंदी भाषेवरील विधानाचे समर्थन केले नव्हते. त्यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हटले होते की, आपल्या देशातील सर्व अधिकृत भाषा समान आहेत. कर्नाटकबाबत बोलाल तर येथे कानडी हीच प्रमुख भाषा आहे. आम्ही कधीच या भाषेच्या महत्वाबाबत तडजोड करणार नाही. आम्ही कानडी भाषा व आमच्या राजच्या संसकृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कटीबद्ध आहोत.

हिंदी भाषा मोठय़ा प्रमाणात बोलली जात असल्याने तीच देश एकसंध ठेवू शकते, असे वक्तव्य करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक देश, एक भाषा’ असा संकेत हिंदी दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना दिला होता.