पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासंबंधी केलेल्या कथित उल्लेखासंबंधीच्या वादावर पडदा टाकण्याच्या हेतूने आपण त्यांना ‘गावातील महिला’ अशा प्रकारे संबोधले नव्हते, असा खुलासा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला. भारतातील दहशतवादी कृत्यांना पाकिस्तानचे पाठबळ असल्याच्या आरोपाचा इन्कार करून आपला देशच दहशतवादी कारवायांचा बळी ठरला आहे, असाही दावा शरीफ यांनी केला.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत उभय नेत्यांची भेट झालेली असतानाच त्याच वेळी पाकिस्तानातील एका दूरचित्रवाणीवरील चर्चासत्रात, पत्रकारांसमवेत झालेल्या अनौपचारिक गप्पांच्या वेळी नवाझ शरीफ यांनी मनमोहन सिंग यांना ‘देहाती औरत’ (गावातील महिला) असे म्हटल्याचे नमूद करण्यात आले होते. या चर्चासत्रात सहभागी झालेल्या एका भारतीय पत्रकाराने शरीफ यांनी तसे म्हटले नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर संबंधित वाहिनीने या चर्चासत्राच्या आयोजकाने हे शेरे मागे घेतले. आपण सिंग यांचा उल्लेख तसा कधीही केलेला नाही, असे शरीफ यांनी नंतर लंडन येथे स्पष्ट केले. मनमोहन सिंग यांच्यासमवेत झालेल्या चर्चेमुळे आपण समाधानी आहोत, असेही शरीफ या वेळी म्हणाले.