हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी मध्यस्थाचे स्पष्टीकरण
ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी कराराला मूर्त स्वरूप देण्यासाठी आपण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी अथवा तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अथवा तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टनी यांची कधीही भेट घेतली नाही, असे या करारातील कथित मध्यस्थ ख्रिस्तियन मायकेल याने बुधवारी स्पष्ट केले.
सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग अथवा अ‍ॅण्टनी यांची करार होण्यासाठी भेट घेतली का, असे विचारले असता मायकेल यांनी तातडीने नाही, कधीही नाही, असे उत्तर दिले. या तिघांची आपण कधीही भेट घेतली नाही, असे त्यांनी एका अबू धाबीतील एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांच्याशी आपण एकदा हस्तांदोलन केले, मात्र त्यांचे इटलीतील उद्योगपती गुइदो हॅस्के आणि अन्य मध्यस्थाशी संबंध असल्याचे कळल्याने त्यागी यांना आपण टाळले, असे मायकेल यांनी या घोटाळ्यातून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करताना सांगितले.
आपण त्यागी यांना कदाचित जिमखाना क्लबमध्ये भेटलो आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केले, असे वाटते मात्र त्यांचे हॅस्के यांच्याशी संबंध असल्याचे कळल्याने आपण खरोखरच त्यांना टाळले, असे मायकेल म्हणाले. भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी कराराबाबत असत्य माहिती दिली नाही, मात्र त्यांची दिशाभूल करण्यात आल्यासारखे वाटते, असेही ते म्हणाले.