बांगलादेश दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ५१ शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या इश्वरीपूर येथील प्राचीन जशोरेश्वरी काली मंदिराला भेट दिली. नियोजित दौऱ्यानुसार मोदी सकाळी अकराच्या सुमारास या मंदिरामध्ये पोहचले. मोदींच्या हस्ते देवीची पुजा करण्यात आली. यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मोदींनी आपण देवीकडे संपूर्ण मानवजातीला करोनापासून मुक्ती द्यावी अशी प्रार्थना केल्याचं सांगितलं.

नक्की वाचा >> “मोदीजी हे आतापर्यंत भारताला लाभलेले सर्वोत्तम जागतिक नेते – नरेंद्र मोदी”

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. काल बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर आज मोदींनी जाशोरेश्वरी मंदिराला भेट दिली. यानंतर एएनआयशी मोदींनी संवाद साधला. “बांगलादेशमध्ये मी जेव्हा २०१५ मध्ये आलो तेव्हा माँ भाग्यश्वरीच्या चरणांमध्ये लीन होण्याचं भाग्य मला मिळालं होतं. आज मला माँ कालीचा आशिर्वाद घेण्याचं भाग्य मिळालं. माँ कालीचा अशिर्वाद आपल्यावर आहे. आज मानवजात करोनामुळे ज्या संकटांमधून जात आहे. तर माझी देवीकडे हीच प्रार्थना आहे की संपूर्ण मानवजातील या करोना संकटातून लवकरात लवकर मुक्त करावं. सर्वे भवंतु सुखिनः जे मंत्र आपण जगत आलोय. वसुदैव कुटुंबकम हे आपले संस्कार असल्याने मी संपूर्ण मानवजातीसाठी प्रार्थना करतो,” असं मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदींनी, “आज मला ५१ शक्तीपिठांपैकी एक असणाऱ्या माँ कालीच्या चरणांचे दर्शन घेतलं. मला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा माझा प्रयत्न असतो की या ५१ शक्तीपिठांपैकी जिथे जिथे शक्य आहे तिथे जाऊन देवीचा आशिर्वाद घेण्याचा प्रयत्न करतो,” असं सांगितलं.

नक्की वाचा >> RTI अर्ज दाखल : मोदींना १९७१ साली कोणत्या कायद्याअंतर्गत अटक झाली?, त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवलं होतं?

नक्की पाहा >> “मोदी World War मध्येही सहभागी झाल्याचा दावा करतील; ‘बेटी बचाओ’अंतर्गत मोदींनीच ‘टायटॅनिक’मधून रोजला वाचवलं”

“आज जेव्हा मी या पवित्र ठिकाणी आलो. येथे मला माँ कालीच्या पुजेची जत्रा असते त्यावेळी मोठ्या संख्येने सीमेच्या पलीकडून (भारतातून) आणि इकडून अनेक भक्त येथे येत असल्याचं समजलं. त्यामुळे इथे अनेक भाविक येतात. त्यामुळे सर्व भक्तांच्या वापरांसाठी एखादा कम्युनिटी हॉल असणं गरजेचं आहे. स्थानिकांनाही येथे धार्मिक कामासाठी कम्युनिटी हॉल गरजेचा आहे. विशेष म्हणजे आप्तकालीन परिस्थितीमध्ये खास करुन वादळांच्या कालावधीमध्ये हा कम्युनिटी मदतकेंद्र म्हणून वापरता येऊ शकतो. म्हणूनच भारत सरकार इथे हा हॉल उभारणार आहे,” अशी घोषणाही मोदींनी केली. तसेच मोदींनी, “मी बांगलादेश सरकारचेही आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आणि प्रकल्पासाठी मान्यता दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो,” असंही म्हटलं.