संसदेत विरोधकांचा गदारोळ; नेहरू-गांधी कुटुंबीयांचा अपमान केल्याचा काँग्रेसचा आरोप

‘नॅशनल हेराल्ड’मुळे संसदेचे कामकाज ठप्प करणाऱ्या काँग्रेसला भाजप खासदार वीरेंद्र सिंह यांच्या आपत्तीजनक विधानामुळे सरकारविरोधात नवा मुद्दा मिळाला आहे. वीरेंद्र सिंह यांनी केलेली टिप्पणी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व त्यांच्या परिवाराचा अवमान करणारी आहे. त्यांच्या विधानामुळे संसदेची प्रतिष्ठा कमी झाली आहे. यातून भाजपचे सूडबुद्धीचे राजकारण उघड झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत वीरेंद्र सिंह यांना माफी मागावीच लागेल, असा इशारा देत काँग्रेस खासदारांनी लोकसभेत सरकारला जाब विचारला. सरकारविरोधात काँग्रेस व तृणमूलच्या सदस्यांनी सभात्याग केला. हिवाळी अधिवेशनाचा सलग तिसरा आठवडादेखील ठोस कामकाजाविना संपला आहे. आता वीरेंद्र सिंह यांच्या विधानामुळे पुढील आठवडय़ातदेखील कामकाजाची शक्यता मावळली आहे.
वीरेंद्र सिंह यांच्या माफीनाम्यासाठी काँग्रेस व तृणमूल काँग्रेस खासदारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आरोपांची धार कायम ठेवली. काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, वीरेंद्र सिंह यांनी संसदीय परंपरेचा अवमान केला आहे.
राहुल गांधी व ज्योतिरादित्य शिंदे यांना ज्वारी व बाजरीतील फरक कळत नाही. ते पुस्तकातून वाचून शेतीविषयी बोलतात, अशा शब्दांत वीरेंद्र सिंह यांनी काँग्रेस नेत्यांची टिंगल केली होती. तेवढय़ावर न थांबता वीरेंद्र सिंह यांनी या दोन्ही नेत्यांच्या आईविषयी वाईट शब्दांत टिप्पणी केली होती. याशिवाय काँग्रेसला पंतप्रधान कार्यालय पटकवण्यासाठी केवळ गोऱ्या महिलेची गरज असते, या वीरेंद्र सिंह यांच्या विधानानंतर सभागृहात विरोधकांचा भडका उडाला होता. त्यांची वादग्रस्त विधाने कामकाजातून वगळण्याची सूचना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केली होती.

नॅशनल हेराल्डप्रकरणी भाजपची पुस्तिका
नवी दिल्ली: नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसला आणखी कोंडीत पकडत भाजपने एक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. ‘फॅमिली ग्रीड अ‍ॅण्ड नॅशनल ब्लॅकमेल’ या नावाची ही पुस्तिका पक्षनेत्यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आल्याचे भाजपने म्हटले आहे.