आयकर विभागाने मोठी कारवाई करत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष कार्याधिकारी (ओएसडी) प्रवीण कक्कड यांच्या घरावर छापे टाकले आहेत. कक्कड यांच्याविरोधात अनेक प्रकरणांची चौकशी सुरू होती. आयकर विभागाने मोठ्या स्तरावर कारवाई करत मध्य प्रदेश, गोवा आणि दिल्लीतील सुमारे ५० जागांवर छापेमारी केली आहे. यामध्ये ३०० अधिकारी सहभागी झाले आहेत. कक्कड यांच्या इंदूर आणि भोपाळ येथील घर आणि कार्यालयात छापे मारण्यात आले आहेत. त्याचबरोबर दिल्लीत कमलनाथ यांच्या आणखी एका निकटवर्तीयाच्या घरावर छापा टाकण्यात आला.

कक्कड यांच्या इंदूर येथील विजयनगर येथील घरी रविवारी सकाळी छापा टाकण्यात आला. दिल्लीहून आयकर विभागाचे पथक पहाटे ३ वाजता त्यांच्या घरी गेले. या पथकाबरोबर सीआरपीएफचा ताफाही उपस्थित होता. कक्कड यांच्या इंदूर येथील घराशिवाय त्यांच्या भोपाळ येथील घर आणि कार्यालयावर छापा मारण्यात आला.

दरम्यान, यापूर्वी कमलनाथ यांचा भाच्याची अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) चौकशी केली आहे. आता त्यांचे निकटवर्तीय कक्कड यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत. कमलनाथ यांचे आणखी एक निकटवर्तीय आर के मिगलानी यांच्या दिल्लीतील ग्रीन पार्क येथील घरावर आयकर विभागाने छापा मारला.