राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. गोरगरीब जनता आणि विकासाच्या राजकारणामुळे भाजपचा विजय झाल्याचे मोदींनी म्हटले आहे.

राज्यातील १६४ नगरपालिका आणि नगरपरिषदेसाठी निवडणूक झाली असून सोमवारी झालेल्या मतमोजणीत या नगरपालिकांमध्ये भाजपचा झेंडा दिमाखात फडकला आहे. या विजयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे राज्यातील जनतेचे आभार मानले. मोदी म्हणाले, जनतेने भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विकासाच्या राजकारणामुळेच भाजपला विजय मिळाला. या विजयासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो असेही ते म्हणालेत. तळागाळापर्यंत काम केल्याने जनतेने भाजपवर विश्वास दाखवल्याचे सांगत मोदींनी या दोन्ही नेत्यांचे कौतुक केले.

राज्यातील १६४ नगरपालिकांमधील निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली होती. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ही निवडणूक झाल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचेही या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. नोटाबंदीच्या निर्णयावरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असतानाच भाजपला मिळालेले हे यश पक्षनेत्यांना दिलासा देणारे आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार २,५०१ जागांपैकी तब्बल ६१० जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे मिनी विधानसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहका-यांची रणनिती यशस्वी ठरली आहे.

राज्यातील ५५ नगरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्याखालोखाल शिवसेनेचे २३, काँग्रेसचे २१, राष्ट्रवादीचे १० तर अन्य पक्षांचे २५ अपक्ष उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. भाजपच्या या विजयाचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीदेखील कौतुक केले आहे. या निवडणुकीसाठी प्रचाराची धूरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थपणे सांभाळली होती. निवडणुकीतील यशामुळे फडणवीस यांचे पक्षातील वजन वाढल्याची चर्चाही रंगली आहे.