जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेमध्ये करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या रविवारी (१२ जुलै २०२०) एक लाख ३४ हजारहून अधिक झाली. अमेरिकेमध्ये रोज करोनाचे हजारो नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर शेकडो लोकं रोज मृत्यूमुखी पडत आहेत. अमेरिकेमध्ये करोना संसर्गासंदर्भात गांभीर्य नसल्याचा आरोप केला जात आहे. अगदी कोवीड पार्ट्यांच्या आयोजनापासून ते मास्क न घालता फिरणे आणि लॉकडाउन उठवण्यासाठी आंदोलन करण्यापर्यंत अनेक गोष्टी मागील काही आठवड्यांमध्ये घडल्या आहेत. याच निष्काळजीपणामुळे करोनाचा फैलाव अधिक वेगाने होत आहेत. अशाच एका कारणामुळे संसर्ग झालेल्या एका तिशीतल्या रुग्णाचा टेक्सास राज्यामध्ये मृत्यू झाला. या व्यक्तीने कोवीड पार्टीला हजेरी लावल्याची माहिती इनसायडर डॉट कॉमने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या तरुणावर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी या रुग्णाने मृत्यूपूर्वी कोवीड पार्टीला हजेरी लावल्याची माहिती दिली. करोना म्हणजे एक अफवा असल्याचे समजून मी सेन अ‍ॅण्टोनी येथील एका पार्टीला करोनाबाधित रुग्णासोबत उपस्थिती लावली होती असं या रुग्णाने मृत्यूपूर्वी सांगितलं.

नक्की वाचा >> Coronavirus Parties… अमेरिकेत जीवाशी खेळणारा ट्रेण्ड; जाणून घ्या नक्की काय होतं पार्टीत

“करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीने या पार्टीचे आयोजन केलं होतं. खरोखरच करोनाचा संसर्ग होतो का हे पाहण्यासाठी या पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला आलेल्या लोकांना संसर्ग होऊ शकतो का हे जाणून घेण्यासाठीच पार्टी ठेवण्यात आलेली,” असं मेथोडीस्ट रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डॉ. जेन अ‍ॅपलबे यांनी एब्ल्यूओएआय एनबीसी न्यूजशी बोलताना सांगितलं. “रुग्णाने मृत्यूपूर्वी नर्सकडे ‘मला वाटतं मी चूक केली. मला वाटलेलं ही अफवा असेल पण तसं नाहीय’, अशा शब्दांमध्ये आपल्या चुकीची कबुली दिली’ होती,” असं डॉ. जेन म्हणाले.

काय आहे हे करोना पार्टी प्रकरण?

एकीकडे प्रशासन आणि आरोग्य खात्याकडून करोनाचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी मास्क वापरण्याबरोबरच इतर सूचना केल्या जात असतानाच अमेरिकेमध्ये अनेकजण स्वातंत्र्याच्या नावाखाली या निर्बंधांकडे दूर्लक्ष करताना दिसत आहेत. अगदी मास्क न घालता फिरण्यापासून ते सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडून एकत्र जमून पार्टी करण्यापर्यंत अनेक गोष्टी या करोना साथीच्या काळातही सुरु आहेत. याचपैकी एक ट्रेण्ड आहे करोना पार्टीचा

अमेरिकेतील अल्बामा येथील काही विद्यार्थ्यांनी नुकत्याच एका कोवीड पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीला उपस्थित राहणाऱ्या कोणत्या व्यक्तीला पहिल्यांदा करोना संसर्ग होतो हे तपासण्यासाठी  या पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे करोनाबाधित रुग्णांनाही या पार्टीला आमंत्रित करण्यात येतं. या करोनाबाधितामुळे इतर कोणाला करोनाचा आधी लागण होते हे जाणून घेण्यासाठी हा खटाटोप केल्याची माहिती समोर आली आहे. बरं ज्या व्यक्तीला सर्वात आधी करोनचा संसर्ग होईल त्याला या पार्टीसाठी विकण्यात आलेल्या तिकिटींच्या पैशामधून ठराविक किंवा संपूर्ण रक्कम विजेता म्हणून दिली जाते. ट्युस्कॅलोसा शहरामध्येही अशा पार्ट्यांचे आयोजन केलं जात असल्याचे एपी या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.