पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज कोलकाता येथे राजभवनात भेट झाली. पश्चिम बंगाल सरकारकडून केंद्र सरकारने घेतलेल्या सीएए, एनआरसी व एनपीआरच्या निर्णयाचा तीव्र विरोध सुरू असताना, ही भेट झाल्याने जोरादार चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना, मी पंतप्रधान मोदींना सीएए,एनआरसी व एनपीआरच्या विरोधात असल्याचे सांगितले आहे. तसेच, हा निर्णय मागे घ्यावा असेही म्हटले असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

केंद्रातील सत्तारूढ भाजपाने सीएए, एनपीआर व एनआरसी लागू करण्याचा घेतलेल्या निर्णयास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध केलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदींच्या कोलकातात दौऱ्यानिमित्त या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे.

राजभवनात या दोन्ही नेत्यांमध्ये साधारण २० मीनिट चर्चा झाली. या भेटीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी औपचारिक भेट असल्याचेही म्हटले आहे. तर, चर्चेदरम्यान पंतप्रधानांना आपण सीएए, एनआरसी व एनपीआरच्या विरोध दर्शवला असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोलकातामध्ये जागोजागी ‘गो बॅक मोदी’ असे फलक झळकावून आपला विरोध दर्शवल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींबरोबरच्या बैठकीवंतर ममता बॅनर्जी सीएएच्या विरोध कार्यक्रमास हजेरी लावणार होत्या. तृणमुल काँग्रेस व अन्य विद्यार्थी संघटनांसह डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमधील विविध भागांमध्ये सीएए विरोधात तीव्र निदर्शनं सुरू केली आहेत. या निदर्शनांमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हजेरी लावणार आहेत.