X
X

अयोध्या प्रकरणाचा निकाल ओवेसींना अमान्य, केली वादग्रस्त मागणी

READ IN APP

ओवेसी यांनी केलेल्या मागणीनंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार होतो आहे

अयोध्या प्रकरणाचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. वादग्रस्त जागी राम मंदिर होईल असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तर मशिदीसाठी पर्यायी पाच एकरची जागा देण्याचाही निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. आता याबाबत एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मौन सोडलं आहे. त्यांनी आज एक ट्विट करत मला माझी मशीद परत हवी असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ओवेसी यांनी हे ट्विट केल्याने नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.

काही ट्विटर यूजर्सनी ओवेसींना थेट १६ व्या शतकात जा असं ठणकावलं आहे. कारण आत्ताचा भारत हा मोगलाईच्या काळातील भारत नाही असंही त्यांना सुनावलं आहे. तर याच प्रतिक्रियेवर एकाने प्रतिक्रिया देत ओवेसींना जास्त मागे पाठवू नका कारण १२ व्या शतकात वगैरे पाठवलंत तर तिथे राम मंदिरच मिळेल असंही खोचक वाक्य लिहिलं आहे.

अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी जेव्हा सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला त्यानंतरही ओवेसी यांची एक प्रतिक्रिया समोर आली होती. “बाबरी मशीद बेकायदा होती तर ती पाडल्याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींवर गुन्हा का दाखल करण्यात आला? आणि ती कायदेशीर होती तर मग ती अडवाणींच्या हिंदुत्ववादी पक्षकारांना का दिली?,” असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला.

राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ९ नोव्हेंबर रोजी निकाल दिला. या बहुप्रतिक्षित खटल्याचा निकाल देताना वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देऊन, मशिदीसाठी अयोध्येत पाच एकर जागा दिली जाईल असं घटनापीठानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयावर ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा मला माझी मशीद परत हवी या आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला जातो आहे.

22
X