दिल्लीतील सामूहिक बलात्कारामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पीडित तरूणीच्या वडिलांनी आज बलात्कार विरोधी सुधारीत कायदा तयार करून त्याला आपल्या मुलीचे नाव देण्याच्या वक्तव्याचा पुर्नउच्चार केला आहे. दिल्लीमध्ये गेल्या १६ डिसेंबर रोजी  धावत्या बसमध्ये काही लोकांनी एका २३ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्यानंतर तिच्यावर उपार सुरू असताना सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ रूग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर काल (बुधवार) तिच्या वडिलांनी बलात्कार विरोधी कायद्याला आपल्या मुलीचे नाव दिल्यास तो तिचा सन्मान ठरेल असे म्हटले होते. तसेच तिचे नाव जाहिर करण्याबाबतही सहमती दर्शवली होती.
ते पुढे म्हणाले की, जर सुधारीत कायद्याला आपल्या मुलीचे नाव नाही दिले तर त्याचा त्यांना नक्कीच त्रास होईल. आपल्या मुलीला लवकर न्याय मिळावा अशी मागणी करताना त्यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे.
पीडित तरूणीच्या वडिलांनी उत्तर प्रदेश सरकारला बलिया येथील त्यांच्या पैतृक गावात आपल्या मुलीच्या नावाने रूग्णालय स्थापन करण्याची मागणी  करत म्हटले की, गावाचे मागासलेपण लक्षात घेता त्यांच्या मुलीचे या गावात रूग्णालय सुरू करण्याचे स्वप्न होते.