नवज्योत सिंग सिद्धू म्हणजे शांततेचे प्रतीक आहेत. ते माझ्या शपथविधी सोहळ्याला आल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. ते शांतीदूत आहेत, त्यांच्यावर जे भारतीय टीका करत आहेत त्यांनी ती करू नये. ते टीका करण्यात त्यांचा वेळ वाया घालवत आहेत. शांतता ही दोन्ही देशांसाठी महत्त्वाची आहे त्याशिवाय दोन्ही देश प्रगती साधू शकत नाहीत असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भातले ट्विट केले आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यात चर्चा होणे आवश्यक आहे. चर्चेशिवाय दोन्ही देशांमधले कोणतेही प्रश्न मार्गी लागणार नाही असेही ट्विट इम्रान खान यांनी केले आहे.

इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याच्या आधी सिद्धू यांनी पाकचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. सिद्धू यांनी लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भारताविरोधात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखांना सिद्धूंनी दिलेल्या आलिंगनामुळं काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर विरोधकांनी हा मुद्दा उचलत टीका केली आहे.

काँग्रेस नेते आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांची गळाभेट घेतल्याने सुरू झालेला वाद शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता या वादात बजरंग दलाने उडी घेतली असून सिद्धू यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस बजरंग दलाने जाहीर केले आहे. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सिद्धूंना शांतीदूत म्हणत त्यांची प्रशंसा केली आहे.