2001 मध्ये पहिल्यांदा गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मला गुजरातचा दक्षिण कोरिया करायचा होता, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रविवारी उत्तराखंड गुंतवणूकदार शिखर संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मोदी म्हणाले, जगातल्या अनेक देशांमध्येही जेवढी ताकद नाही तेवढी ताकद आपल्या देशाच्या अनेक राज्यांमध्ये आहे. अनेक छोट्या देशांसोबत तुलना केल्यास आपल्या लहान राज्यांमध्येही त्या देशांपेक्षा जास्त क्षमता असल्याचं लक्षात येईल. मला अजूनही आठवतं जेव्हा मी 7 ऑक्टोबर 2001 मध्ये पहिल्यांदा गुजरातचा मुख्यमंत्री झालो होतो, प्रशासन काय असतं याबाबत मला काहीच अनुभव नव्हता. मी पुर्णतः नवखा होतो. त्यावेळी एका पत्रकाराने मला ‘गुजरातच्या विकासासाठी तुमचा आदर्श कोण’ असा प्रश्न विचारला होता. सामान्यतः असा प्रश्न विचारल्यावर बहुतेक लोक सांगतात की, त्यांना त्यांचा प्रदेश अमेरिका किंवा इग्लंड सारखा बनवायचा आहे. पण मी त्याला जरा वेगळं उत्तर दिलं. मला गुजरात दक्षिण कोरिया सारखा बनवायचा आहे असं मी त्याला सांगितलं. त्या पत्रकाराला काही कळालं नाही. तेव्हा मी त्याला गुजरात आणि दक्षिण कोरियाची लोकसंख्या सारखीच आहे, मी याचा सखोल अभ्यास केला असून आपण त्या दिशेने वाटचाल केल्यास आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही, हे सांगितलं.

यावेळी बोलताना, भारत सध्या महत्वाच्या सामाजिक आणि आर्थिक बदलातून जात आहे. त्यानंतर निर्माण झालेला नवा भारत हा जागतिक विकासासाठी उत्प्रेरक ठरेल, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते म्हणाले, नव्याने वापरण्यात येणाऱ्या ऊर्जा क्षेत्रासाठी भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्याचबरोबर २०३० पर्यंत देशातील ४० टक्के ऊर्जा ही बिगर जीवाश्म इंधन स्त्रोतापासून तयार होईल, असे आम्ही निश्चित केले आहे. मोदी म्हणाले, जगातील प्रत्येक महत्वाच्या संस्थांनी हे भाकीत केले आहे की, येत्या दशकांमध्ये भारत जगाच्या विस्तारामध्ये इंजिन म्हणून काम करेल. भारताची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांपासून स्थिर असून आर्थिक तूट कमी झाली आहे. महागाई नियंत्रणात असून देशातील मध्यमवर्गाची स्थिती सुधारत आहे. उत्तराखंडबाबत बोलताना मोदी म्हणाले, राज्याकडे सेंद्रीय राज्य म्हणून विकसित होण्याची क्षमता आहे. त्यासाठी जे काम सुरु करण्यात आले आहे ते क्लस्टर बेस्ड सेंद्रिय शेती असे आहे. येथे निसर्ग, थरार, संस्कृती, योग आणि ध्यान अशा सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे उत्तराखंड टुरिझम हे संपूर्ण पॅकेज आणि आदर्श ठिकाण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, ‘मेक इन इंडिया’ हे केवळ भारतासाठी नसून ही मोहिम संपूर्ण जगासाठी असल्याचे यावेळी मोदींनी गुंतवणूकदारांसमोर बोलताना सांगितले. या दोन दिवसीय समिटमध्ये जपान, चेक रिपब्लिक, अर्जेटिना, मॉरिशस आणि नेपाळ देशाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सोमवारी या समिटची सांगता होणार असून यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह याचे अध्यक्षपद भुषवतील.