पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील मीम शेअर करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्या प्रियंका शर्मा यांनी तुरूंगातून बाहेर आल्यानंतर बुधवारी पहिली प्रतिक्रिया दिली. आपण ममता बॅनर्जी यांची माफी मागणार नसून हा खटला लढणार असल्याचे स्पष्टीकरण प्रियंका शर्मा यांनी दिले. मला घाबरवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु मी आता घाबरणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

मंगळवारी मला जामीन मंजुर करण्यात आला होता. जामीन मंजुर झाल्याच्या १८ तासांनंतरही आपली सुटका करण्यात आली नाही. तसेच मला माझ्या कुटुंबीयांशी आणि वकिलांचीही भेट घेऊन दिली नसल्याचे शर्मा म्हणाल्या. याव्यतिरिक्त आपल्याला माफीनाम्यावरही स्वाक्षरी करण्यास सांगितले. परंतु आपण माफीनाम्यावर स्वाक्षरी करणार नसून खटला लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला खडे बोल सुनावत प्रियंका शर्मा यांना करण्यात आलेली अटक ही मनमानी असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांना न सोडल्यास न्यायालयाच्या अवमानतेचा खटला सुरू केला जाईल, असेही नमूद केले होते.

ममता बॅनर्जी यांचे फेरफार केलेले छायाचित्र सोशल मीडियावर टाकल्याच्या आरोपावरून भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्या प्रियंका शर्मा यांच्याविरोधात शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. शनिवारी प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी शर्मा यांना अटक केली. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. याविरोधात शर्मा यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने प्रियंका शर्मा यांना विनाशर्त माफी मागण्याचे निर्देश दिले होते. प्रियंका शर्मा यांनी माफी मागितल्यावर त्यांची तुरुंगातून सुटका करावी, असे निर्देशही देण्यात आले होते. तसेच पश्चिम बंगाल सरकारलाही सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली असून राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणाऱ्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी एखाद्या राजकीय नेत्यावर कारवाई करता येईल का, याबाबत स्पष्टीकरण देण्यासही न्यायालयाने सांगितले आहे.