आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु असलेले रॉबर्ट वढेरा यांनी राजकारणातील प्रवेशाबाबत भाष्य केले आहे. ‘या प्रकरणात माझे निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत मी राजकारणात येणार नाही’, असे वढेरा यांनी म्हटले आहे.

रॉबर्ट वढेरा हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे व काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती आहेत. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी रॉबर्ट वढेरा यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. २००५ ते २०१० या पाच वर्षांत वढेरा यांनी लंडनमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी केली होती. या मालमत्ता खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे.

काही दिवासंपूर्वी रॉबर्ट वढेरा यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. जनतेची सेवा करण्यासाठी मोठी भूमिका वठविण्याचे संकेत वढेरा यांनी दिले होते. अखेर बुधवारी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रॉबर्ट वढेरा यांनी राजकारणातील प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट केली. ‘मी या देशात राहतो. ज्यांनी या देशाला लुटले ते देशाबाहेर पळून गेले. त्यांचे काय ?. मी भारत सोडून कधीच जाणार नाही. तसेच माझी चौकशी पूर्ण होईपर्यंत मी सक्रीय राजकारणात देखील येणार नाही हा माझा शब्द आहे’, असे वढेरा यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी त्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे वढेरा यांचे छायाचित्र असलेली पोस्टर्स झळकली आणि त्यावर निवडणूक लढण्यासाठी स्वागत असो, असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. तेव्हापासून वढेरा यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा रंगल्या आहेत.