संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते शरद यादव यांनी पक्षाबाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘मी संयुक्त जनता दलाचा संस्थापक आहे. मी पक्ष सोडलेला नाही,’ अशा शब्दांमध्ये शरद यादव यांनी पक्ष सोडण्याबद्दलच्या चर्चांवर भाष्य केले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यावर शरद यादव यांनी नाराजी व्यक्त केली होती. यादव यांची नाराजी अद्याप कायम असून त्यामुळेच संयुक्त जनता दलामध्ये फूट पडेल, अशी चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात आहे.

शरद यादव संयुक्त जनता दलातून बाहेर पडतील, अशी चर्चा असताना खुद्द यादव यांनीच यावर प्रतिक्रिया दिली. ‘बिहारमधील मतदारांनी महाआघाडीसाठी मतदान केले होते. त्यामुळेच महाआघाडी तुटल्याचे दु:ख मतदारांच्या मनात आहे. मी पक्ष सोडलेला नाही आणि पक्ष सोडणारही नाही,’ अशा स्पष्ट शब्दांमध्ये यादव यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. यापुढे बोलताना ‘मीच पक्षाची स्थापना केली आहे,’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना अप्रत्यक्ष संदेश दिला.

संयुक्त जनता दलामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे मागील आठवड्यात पक्षाकडून सांगण्यात आले. मात्र यासोबतच शरद यादव आणि अली अन्वर पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहतील की नाही, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नसल्याचेही पक्षाकडून सांगण्यात आले. १९ ऑगस्टला संयुक्त जनता दलाची बैठक होणार आहे. या बैठकीकडे राजकीय वर्तुळातील अनेकांचे लक्ष लागले आहे. नितीश कुमार यांचा महाआघाडी तोडण्याचा निर्णय शरद यादव यांना रुचलेला नाही. त्यामुळेच या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.

‘संयुक्त जनता दलामध्ये फूट पडलेली नाही. १९ ऑगस्टला पक्षाची बैठक होणार आहे. मात्र या बैठकीला शरद यादव आणि अली अन्वर उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे,’ असे पक्षाचे नेते के. सी. त्यागी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘शरद यादव यांना त्यांचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार आहे,’ असे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. यासोबतच भाजपसोबत जाण्याचा निर्णय पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून घेण्यात आला, असेदेखील नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.