पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांअगोदर राजकीय वातावारण चांगलच तापल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपा नेत्यांकडून कंबर कसली गेली आहे. याचबरोबर, डावी आघाडी व काँग्रेसने देखील तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी देखील सूचक इशारा दिला आहे.

“मै अकेलाही चला था जनीब ए मंजील मगर, लोक साथ आते गये और कारवाँ बनता गया..पश्चिम बंगालमधील पक्षाच्या रणनीतीबाबत मी योग्य वेळी बोलणार” असा सूचक इशारा, एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे. आयएसएफचे अब्बास सिद्दीकी काल(रविवार) कोलकातामध्ये डावे पक्ष आणि काँग्रेससोबत एका मंचावर आल्यावरून, ओवेसी बोलत होते.

“ओवेसीला विकत घेऊ शकेल असा आजपर्यंत कुणी जन्माला आलेला नाही”

या अगोदर भाजपा असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमला बंगालमध्ये आणण्याचे प्रयत्न करत आहे, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया देताना ओवेसींनी. “आजपर्यंत असा कुणी जन्माला आलेला नाही की जो पैशांनी ओवेसीला विकत घेऊ शकेल. त्यांचे आरोप निराधार आहेत व त्या अस्वस्थ आहेत. त्यांनी आपल्या घराची(पक्ष)ची काळजी केली पाहिजे, कारण त्यांचे अनेक लोकं भाजपात जात आहेत. त्यांनी बिहारचे मतदार व आमच्यासाठी मतदान करणाऱ्या लोकांचा अपमान केला आहे.” असं म्हटलं होतं.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात पार पडणार विधानसभा निवडणूक

आगामी काळात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा शुक्रवार जाहीर करण्यात आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रकारपरिषद घेऊन याबाबत घोषणा करण्यात आली. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासीत प्रदेशाची विधानसभा निवडणूक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकारपरिषेदत निडवणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्यानुसार २७ मार्च ते २९ एप्रिल पर्यंत मतदान होणार असून,सर्व राज्यांमधील निवडणुकांचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. पाच राज्यांमधील विधानसभेच्या ८२४ जागांवर मतदान होणार आहे.

या पाच राज्यांपैकी सर्वाधिक चर्चा असलेली व अवघ्या देशाचे लक्ष लागलेली पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तब्बल आठ टप्प्यात होणार आहे. यानुसार पहिला टप्प्यातील मतदान – २७ मार्च, दुसरा टप्पा – १ एप्रिल, तिसरा टप्पा- ६ एप्रिल, चौथा टप्पा – १० एप्रिल, पाचवा टप्पा १७ एप्रिल, सहावा टप्पा – २२ एप्रिल, सातवा टप्पा – २६ एप्रिल व आठवा टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे.