आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी गायींशीसंदर्भात एक विधान केले आहे. आपण स्वत: मुख्यमंत्री निवसात गायींचे संगोपन करणार असून त्या गायीच्याच दुधाचे सेवन करणार असल्याचे देब यांनी म्हटले आहे.

आज मी अशी घोषणा करतो की मी आणि माझे कुटुंबिय आजपासून मुख्यमंत्री निवासामध्ये गायींचे संगोपन करणार आहोत असे सांगतानाच आम्ही त्या गायींच्याच दुधाचे सेवन करणार असल्याची माहिती देब यांनी दिली. यामुळे त्रिपुरामधील लोकांनाही असं करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आहे. सर्वांनीच असे केल्याने कुपोषणाच्या प्रश्नावर मात करता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने हाती घेतलेल्या गायी वाटप मोहिमेबद्दल बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

आर्थिक परिस्थीती बेताची असलेल्यांना मदत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारमार्फत गायींचे वाटप केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये राज्यातील ५ हजार कुटुंबांना गायींचे वाटप करण्यात येणार आहे. या गोसंगोपनामुळे मिळणारे उत्पन्न हे कोणत्याही उद्योगधंद्यांपेक्षा अधिक चांगले असेल असा विश्वास देब यांनी व्यक्त केला. आपल्या या मोहिमेची माहिती देताना देब म्हणाले, आम्ही राज्यामध्ये पाच हजार कुटुंबांना गायींचे वाटप करणार आहोत. मी औद्योगिकरणाच्या विरोधात नाही. मात्र त्यामध्ये २ हजार जणांना रोजगार देण्यासाठी १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. पण मी त्याऐवजी पाच हजार कुटुंबांना १० हजार गायींचे वाटप केले तर ती कुटुंबे अवघ्या सहा महिन्यामध्ये पैसे कमवू लागतील असं देब म्हणाले.

अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गायींचे संगोपन करणारे देब हे पहिलेच मुख्यमंत्री नसतील. याआधी १९९० च्या दशकामध्ये बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांनीही आपल्या निवासस्थानी गायींचा गोठा उभारला होता. मार्चमध्ये मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यापासून देब हे सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. याआधीही त्यांनी त्रिपुरामधील तरुणांना आपला वेळ फुकट घालवण्यापेक्षा दुग्धव्यवसाय करा किंवा अगदी पानाची टपरी सुरु करा असाही सल्ला दिला होता.