पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पुत्र बिलावल भुत्तो यांनी पाकिस्तानी पिपल्स पार्टी (पीपीपी) भारताकडून संपूर्ण काश्मिर परत मिळवेल असे विधान केले. ते शुक्रवारी पंजाब प्रांतातील मुलतान येथे झालेल्या ‘पीपीपी’ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. मी संपूर्ण काश्मिर परत मिळवेन, पाकिस्तानच्या वाट्याच्या काश्मिरचा एक इंचदेखील मागे सोडणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी या मेळाव्यात केले. भुत्तो घराणे हे पाकिस्तानच्या राजकारणातील एक प्रभावशाली कुटूंब म्हणून ओळखले जाते.
बिलावल भुत्तो यांनी हे विधान केले तेव्हा, त्या ठिकाणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी आणि राजा परवेझ अश्रफ हेदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपण पाकिस्तानमध्ये २०१८ साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लढविण्याच्या विचारात असल्याचे सांगितले.