माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशातील आर्थिक स्थितीवरून मोदी सरकारला चांगलेच सुनावले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर जे अरिष्ट आले आहे, ते केवळ मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक व्यवस्थापनामुळे आल्याचे डॉ. सिंग म्हणाले. सिंग यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘मी त्यांचे मत जाणून घेईल. हेच माझे उत्तर आहे’, असे सांगत आरोपांवर मौन बाळगले.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या उंबरठ्यावर आर्थिक मंदी येऊन ठेपलेली असताना देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत आहे. मागील तिमाहीतील विकासदर (जीडीपी) 5 टक्क्यांवर आला आहे. हे आपण मंदीकडे जात असल्याचे निदर्शक आहेत. विकास करण्याची प्रचंड क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत असताना मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हे आर्थिक आरिष्ट ओढवले आहे, असे मत सिंग यांनी व्यक्त केले होते.

देशातील तरुण, शेतकरी, शेतमजूर, उद्योजक आणि उपेक्षित प्रवर्ग चांगल्या जीवनमानासाठी पात्र आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला लागलेली घसरण परवडणारी नाही. भारतीय अर्थव्यवस्थेवर ओढवलेल्या मानव निर्मित संकटातून बाहेर पडण्यासाठी राजकीय द्वेष बाजूला ठेवा आणि विचार करणाऱ्या, विवेकी माणसांपर्यंत सरकारने जावे अशी माझी सरकारला विनंती आहे, असेही सिंग म्हणाले होते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवी दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या, ‘इथे उद्योग प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यायला आले आहे. त्यांना सरकारकडून काय अपेक्षा आहे, याविषयी त्यांच्या काय सूचना आहेत, त्या जाणून घ्यायच्या आहेत’. यावेळी मनमोहनसिंग यांच्या आरोपांवर बोलताना सीतारामन म्हणाल्या, ‘डॉ. मनमोहन सिंग यांनी राजकीय सूड भावनेतून बोलण्याऐवजी सूज्ञ लोकांशी चर्चा करून उपाय शोधायला नको काय? असे काही ते म्हणाले आहेत का? यावर मी त्यांचे मत जाणून घेईल. हेच माझे उत्तर आहे’, असे म्हणून त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले.