16 November 2019

News Flash

AN-32 ची शोध मोहीम किती कठिण आहे ते समजून घ्या….

१२ हजार फूट उंचीवर लिपो या छोटयाशा गावाजवळ हे अवशेष आढळले असून त्या गावाची लोकसंख्या फक्त १२० आहे.

संग्रहित छायाचित्र

आठ दिवसाच्या शोध मोहिमेनंतर अखेर मंगळवारी अरुणाचल प्रदेशच्या पश्चिमेला सियांग जिल्ह्यात बेपत्ता AN-32 विमानाचे अवशेष दिसले. आता प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी पोहोचण्याचे ऑपरेशन सुरु झाले आहे. आज सकाळी एक पथक अपघात स्थळाच्या ठिकाणी रवाना झाले आहे. यामध्ये हवाई दल, लष्कराचे जवान आणि गिर्यारोहकांचा समावेश आहे. लिपोपासून उत्तरेला १६ किलोमीटर अंतरावर हे अवशेष आढळले.

काल एमआय-१७व्ही५ आणि चीता हेलिकॉप्टरने AN-32 चे अवशेष शोधून काढले. पण उंचावरील प्रदेश आणि घनदाट जंगल भागामुळे हेलिकॉप्टरचे लँडिंग करणे शक्य झाले नाही. १२ हजार फूट उंचीवर लिपो या छोटयाशा गावाजवळ हे अवशेष आढळले असून त्या गावाची लोकसंख्या फक्त १२० आहे. काल अवशेष दिसल्यानंतर लँडिंग करणे शक्य झाले नव्हते. आता हवाई दलाने लँडिंगची जागा निवडली असून हेलिकॉप्टरद्वारे बचाव मोहिम सुरु होणार आहे.

जमिनीवरील पथके रात्रभर विमान क्रॅश झाले त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होती. स्थानिक पथकांबरोबर एअर फोर्स गरुड कमांडोही बचाव मोहिमेत सहभागी होतील. विमान कोसळले तो भाग घनदाट जंगलाची व्यापलेला आहे. हा भागात ढगांमुळे दृश्यमानता खूप कमी असते आणि बचाव मोहिमे दरम्यान हे आव्हान असेल. जमिनीवरुन पथके पाठवली तर त्यांना तिथे पोहोचायला २४ तासांचा वेळ लागेल.

विमानाचे अवशेष दिसले असले तरी आता त्या विमानात असणाऱ्या १३ जणांना शोधण्याचे आव्हान आहे. विमानाचे तुकडे मोठया प्रदेशात विखुरलेले असू शकतात. त्यामुळे बचाव मोहिमेसाठी मोठया प्रमाणावर मनुष्यबळ लागू शकते. क्रॅश साईटवर पोहोचलेल्या बचाव पथकांना तिथे थांबण्याची तयारी ठेवावी लागेल. कारण खराब हवामानामुळे हवाई उड्डाण प्रत्येकवेळी शक्य होणार नाही.

आसामच्या जोरहाट तळावरुन ३ जून रोजी दुपारी १२.२५ च्या सुमारास एएन-३२ ने अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथील तळावर जाण्यासाठी उड्डाण केले होते. ते दुपारी दीड वाजता पोहोचणे अपेक्षित होते. दुपारी १२.२५ वाजता या विमानाने उड्डाण केले आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांचा त्याच्याशी दुपारी १ वाजता शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर हे विमान बेपत्ता झाले होते.

First Published on June 12, 2019 1:52 pm

Web Title: iaf an 32 aircraft wreckage obstacles