भारतीय हवाई दलाकडून गुरुवारी रात्री पाकिस्तानी सीमारेषेलगत कसून सराव करण्यात आला. अनेक लढाऊ विमानांना या सरावात सहभागी करुन घेण्यात आलं होतं. अमृतसर आणि पंजाबमधील सीमारेषेवर या विमानांचं उड्डाण करण्यात आलं असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर सीमारेषेवर तणाव आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याची शक्यता असल्यानेच हा सराव करण्यात आला.

भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी अमृतसरसहित सीमारेषेवरील जिल्ह्यांमध्ये सुपरसॉनिक गतीने उड्डाण घेत तयारीचा आढावा घेतला. यावेळी फ्रंटलाइन फायटर प्लेनही सहभागी झाले होते. पाकिस्तानी हवाई दल पुन्हा भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करु शकतं यादृष्टीने चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून हा सराव करण्यात आला.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तानने त्यांची लढाऊ विमानं भारतीय हवाई हद्दीत आणली होती. तेव्हापासून भारतीय हवाई दल हाय अलर्टवर आहे. १३ मार्चला दोन पाकिस्तानी फायटर विमानांनी रात्री उशिरा भारतीय हद्दीजवळून उड्डाण केले होते. जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानला लागून असणाऱ्या सीमेजवळ ही पाकिस्तानी विमाने उड्डाण करत होती.पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर भारतीय हवाई दल लक्ष ठेवून आहे.

बुधवारी रात्री पाकिस्तानला लागून असणाऱ्या पंजाबमधील अमृतसरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले होते. यामुळे स्थानिक लोक दहशततीत होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने शहरातील लोक घाबरले होते. त्यावेळी हा आवाज नेमका कशाचा होता याची माहिती मिळू शकली नव्हती. सराव सुरु असताना जवळून जाणाऱ्या एखाद्या विमानाचा हा आवाज असावा असा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे.