नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवानच्या धुमश्चक्रीनंतर भारताने सीमेलगत मोर्चेबांधणीत वाढ केली असून हवाईदल प्रमुख आरकेएस भादुरिया यांनी लेह व श्रीनगर येथे भेट देऊन हवाई दलाच्या सज्जतेची चाचपणी केली.

गलवान भागातील धुमश्चक्रीत २० जवान शहीद तर ७६ जण जखमी झाल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. भारतीय हवाई दलाने सीमेवरील सर्व तळांना सतर्क केले असून जेट विमाने व लढाऊ हेलिकॉप्टर्स तेथे तैनात करण्यात आली आहेत. एअर चिफ मार्शल भादुरिया यांनी लेहच्या हवाई दल तळाला भेट दिली असून तेथील तयारीचा आढावा घेतला. लेहला भेट दिल्यानंतर ते श्रीनगरला गेले असून तेथे वरिष्ठ हवाई दल अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.  भारतीय हवाई दलाने सुखोई ३० एमकेआय, जग्वार, मिराज २०००, विमाने व अपाची हेलिकॉप्टर्स श्रीनगर व लेह  येथील हवाई तळांवर आणली आहेत. भारतीय हवाई दलाची विमाने सीमेवर घिरटय़ा घालत आहेत. चीनच्या लष्करानेही हवाई गस्त वाढवली आहे. अरुणाचल, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व लडाख भागात आधीच सैन्याची कुमक वाढवली आहे.

चीनचे दोन अधिकारी ठार

चिनी सैनिकांसमवेत १५ जूनच्या रात्री गलवान भागात जी धुमश्चक्री झाली  त्यात पीपल्स लिबेरशन आर्मीचे दोन अधिकारी ठार झाले, असे माहितगार सूत्रांनी म्हटले आहे. चीनने पीपल्स लिबरेशन आर्मीची हानी झाल्याचे मान्य केले असले तरी मारले गेलेल्यांचा आकडा सांगण्यास नकार दिला होता. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांच्यासमवेत चीनच्या परराष्ट्र अधिकाऱ्यांची एक बैठक नियोजित होती, त्यापूर्वीच भारताशी चकमकीत चीनचे सैनिक मारले गेल्याची कबुली दिल्याने नाचक्की होईल या भीतीने चीनने हा आकडा जाहीर करण्याचे टाळले असे बोलले जाते.

‘करोना परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा चीनचा प्रयत्न’

वॉशिंग्टन : चीनने भारतीय सीमेवर २० जवानांना मारण्याचे कृत्य केवळ कोविड १९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे अशी टीका अमेरिकेने केली आहे. अमेरिकेचे पूर्व आशिया व पॅसिफिक कामकाज विभागाचे अधिकारी डेव्हीड स्टीलवेल यांनी म्हटले आहे की, ‘सध्या जग कोविड १९ साथीच्या नियंत्रणात गुंतलेले असताना चीनने गैरफायदा घेऊन गैरकृत्ये केली आहेत. भारत व चीन दरम्यानच्या स्थितीवर ट्रम्प प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. चीनने यापूर्वी सीमेवर डोकलाम व इतर भागात जी कृत्ये केली होती तशातलाच हा प्रकार आहे. जगाचे लक्ष करोना साथीकडे असताना चीन त्याचा गैरफायदा घेत आहे.

‘भारताचा एकही सैनिक ताब्यात नाही’

बीजिंग : भारताचा एकही सैनिक सध्याच्या स्थितीत स्थानबद्ध केलेला नाही, असे चीनने शुक्रवारी म्हटले आहे. त्यामुळे भारताने काल दहा सैनिकांची मुक्तता केल्याच्या दाव्याला दुजोरा मिळाला आहे. चिनी सैन्याने १५ जूनला गलवानमध्ये झालेल्या धुमश्चक्रीवेळी काही सैनिकांना ओलिस ठेवले होते. त्यांची काल दोन्ही देशाच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर मुक्तता करण्यात आली होती. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री जी चकमक झाली होती त्यात सहभागी सर्व सैनिकांचा हिशेब लागला असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले होते. चीनचे परराष्ट्र प्रवक्ते लिजियान यांनी म्हटले आहे, की आमच्या मते चीनच्या ताब्यात भारताचा एकही सैनिक नाही.