काश्मीर खोऱ्यातील जनता गेल्या आठवडय़ापासून प्रलयंकारी पुराच्या तडाख्यात सापडली असताना कुठेही नजरेस न आलेल्या फुटीरतावाद्यांनी पुराचे पाणी ओसरू लागताच डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. ऐन पुरात आणि त्यानंतर गेले किमान १० दिवस काश्मिरी जनतेसाठी अहोरात्र राबणाऱ्या लष्कराच्या बोटी, विमाने आणि हेलिकॉप्टरवर या फुटीरवाद्यांनी दगडफेक करून त्यांना नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न चालवला आहे.
गेल्या मंगळवारपासून काश्मीर खोरे महापुराने जलमय झाले आहे, तेव्हापासून लष्कर आणि एनडीआरएफचे जवान दिवस-रात्र मदतीसाठी झटत आहेत. लाखो नागरिकांना सुटकेचा आशेचा किरण फक्त जवानांच्या रूपात दिसत आहे. अर्थात अडकलेल्या नागरिकांची संख्या आणि लष्कराचे मनुष्यबळ यांच्या व्यस्त प्रमाणामुळे सगळ्या नागरिकांची एकदम सुटका होणे शक्य नाही. परिणामी सुटका होत नसलेल्यांचा संताप होण्याच्या घटनाही घडत आहेत. नेमका याचाच फायदा फुटीरतावाद्यांनी घेतला असून लष्कर व एनडीआरएफ यांच्या बोटी तसेच लष्कराच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.
लष्कराची एकूण ८० हेलिकॉप्टर व विमाने पूरग्रस्तांसाठी कार्यरत आहेत. मदतसाहित्याचे वाटप करण्यासाठी हेलिकॉप्टर अगदी खालून उड्डाण करू शकतात. अशाच काही हेलिकॉप्टरवर दगडफेक झाली. सुदैवाने त्यात मोठे नुकसान झाले नाही. मात्र एका हेलिकॉप्टरच्या पंख्याचे नुकसान झाल्याची माहिती हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
श्रीनगरच्या काही ठरावीक भागांत मदतकार्यात विघ्न आणण्यास आणि हेलिकॉप्टर व विमानांवर दगड मारण्यासाठी तरुणांना फुटीरतावादी चिथावत असल्याचे वृत्त आहे. मात्र अशा प्रकारांमुळे आम्ही मदतकार्य थांबवणार नाही.
– एस. बी. देव, एअर मार्शल