चिनी सैन्याने गलवान खोऱ्यातून माघार घेतली असली तरी भारताची तिन्ही सैन्य दलं प्रचंड सर्तक आहेत. याच सर्तकतेचा भाग म्हणून पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमारेषेजवळच्या फॉरवर्ड बेसवर भारताच्या फायटर विमानांनी सोमवारी रात्री कसून सराव केला. या सरावामध्ये मिग-२९ फायटर विमाने, अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर्स सहभागी झाले होते.

चीनने कुठलीही आक्रमकता दाखवल्यास त्यांचा सामना करण्यासाठी तयारीचा भाग म्हणून रात्रीच्यावेळी हा सराव करण्यात आला असे इंडियन एअर फोर्सच्या अधिकाऱ्याने इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना सांगितले. गलवान खोऱ्यात संघर्ष झालेल्या पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळून चिनी सैन्य एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे फिरले आहे. पण परिस्थिती अजूनही पूर्णपणे सामान्य झालेली नाही.

शब्द फिरवून दगाबाजी करायची हा चीनचा जुना स्वभाव आहे. त्यामुळे भारताची तिन्ही सैन्यदलं चीनला लागून असणाऱ्या सर्व सीमांवर सर्तक आहेत. भविष्यात तणाव वाढल्यास त्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आयएएफ सज्ज असल्याचा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला. रात्रीच्या ऑपरेशन्समध्ये शत्रूला चकवा, आश्चर्याचा धक्का देता येतो. कुठल्याही वातावरणात आव्हानाचा सामना करण्यासाठी IAF प्रशिक्षित आणि सज्ज असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

भारत-चीनकडून तणाव निवळण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर आयएएफने अशा प्रकारचा सराव केला. सोमवारी सकाळी गलवान खोऱ्यातून चिनी सैन्याने आपले तंबू काढले व सैन्य वाहनांसह सैनिक एक ते दोन किलोमीटर माघारी फिरले. दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने असल्यामुळे या भागात मोठया प्रमाणावर तणाव होता. पण आता तणाव कमी करण्याच्या दिशेने दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरु झाले आहेत.