भारतीय हवाईदल हे कमी वेळेत पूर्ण क्षमतेने चीनला उत्तर द्यायला तयार असल्याचे हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी म्हटले आहे. गुरुवारी येथे ‘एअरफोर्स डे’ निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


एअरचीफ मार्शल धनोआ म्हणाले, आमचे सैन्य कुठलेही आव्हान स्विकारुन पूर्ण तयारीनिशी लढण्यासाठी तयार आहे. हवाईदलाला सोबत घेऊन सर्जिकल स्ट्राईकसारखा निर्णय सरकारने घेतल्यास हवाईदल टू-फ्रन्ट वॉरसाठी तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पूर्ण तयारीने लढण्यासाठी आम्हाला ४२ लढाऊ विमानांची आवश्यकता असल्याचे ते यावेळी म्हणाले.


या विमानांची कमतरता असताना टू-फ्रन्ट वॉरसाठी आपण सज्ज आहात का या प्रश्नावर धनोआ म्हणाले, यासाठी आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे. चीनी सैन्याच्या तुकड्या अद्यापही डोकलामच्या चंबी खोऱ्यात तैनात आहेत. मात्र, त्या लवकरच मागे फिरतील अशी आशा असल्याचे ते म्हणाले.

पाकिस्तानकडे आण्विक अस्त्रे आहेत या मुद्द्यावर बोलताना धनोआ म्हणाले, पाकिस्तानातील ही अण्वस्त्रे शोधून काढणे, त्यांच्यावर नजर ठेवणे आणि ती उध्वस्त करण्याचीही आपल्या हवाईदलाची क्षमता आहे.


प्रत्यक्ष युद्ध सुरु नसताना शांततेच्या काळातही आपण अनेक जवान गमावले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी आणि आपल्या जवानांची जीव धोक्यात येऊ नयेत यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे ते यावेळी म्हणाले.