हरयाणातील अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर लढाऊ जग्वार विमानाचा मोठा अपघात टळला. या विमानाची आकाशात उडणाऱ्या पक्ष्याशी धडक झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. यावेळी विमानातील काही भाग रहिवासी भागात कोसळला मात्र त्यामुळे विशेष काही हानी झालेली नाही. पायलटच्या प्रसंगावधानामुळे विमान यशस्वीरित्या लँड झाले.

विमानाच्या एका इंधनाच्या टाकीला पक्ष्याची धडक बसल्याने ते बंद पडले होते. यामुळे उडत्या विमानाला धोका निर्माण होऊ नये आणि मोठी दुर्घटना घडू नये यासाठी पायलटने विमानाची अतिरिक्त इंधनाची टाकी आणि छोटे प्रॅक्टिस बॉम्ब विमानातून मोकळ्या जागी टाकले. त्यानंतर अंबाला एअरबेसवर सुरक्षितरित्या लँडिंग केले. पायलटच्या या विवेकबुद्धीमुळे मोठा अपघात टळू शकला.

यापूर्वी ८ जून रोजी गोवा विमानतळावर भारतीय नौदलाचे मिग 29K विमानाच्या इंधनाची टाकी कोसळल्याने काही काळ विमानतळावरील विमानांची वाहतूक थांबवावी लागली होती. उड्डाण केल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे पायलटला इंधनाची टाकी खाली टाकावी लागली होती.

इंधनाची टाकी खाली का टाकतात?
प्रत्येक विमानात इंधनाची एक ठरावीक क्षमता असते. विमानाची ही क्षमता वाढवण्यासाठी विमानाला बाहेरुन अतिरिक्त इंधन टाकी (डॉप टँक) जोडली जाते. यामुळे विमानाच्या उड्डाणाच्या क्षमतेत वाढ होते. आपातकालीनस्थितीत विमानाचा स्फोट होऊ नये यासाठी पायलटला जेव्हा वाटेल तेव्हा तो या इंधनाच्या टाकीला विमानापासून हटवू शकतो.