गुजरातमध्ये सुरू असलेल्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट (व्हीजीजीएस) कार्यक्रमादरम्यान एक अपघात झाला. यात वायू दलाचा एका स्काय ड्रायव्हर जखमी झाला असून या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. तीन स्काय ड्रायव्हरनी आकाशात आपल्या पॅराशूटच्या साहाय्याने तिरंगा तयार केला होता. हवेत असताना तिघांनी आपले संतुलन व्यवस्थित ठेवले होते. परंतु अचानक जोरात आलेल्या हवेच्या एका झोताने तिघांचेही संतुलन बिघडले. त्यावेळी केशरी आणि पांढऱ्या रंगाचा पॅराशूट असलेले स्काय ड्रायव्हर बाजूला झाले. परंतु हिरव्या रंगाचा पॅराशूट असलेल्या स्काय ड्रायव्हरचे संतूलन बिघडले आणि तो ड्रायव्हर थेट वेगाने जमिनीवर जाऊन पडला.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जखमी झालेला जवान हा आकाश गंगा टीमचा आहे. तो ३० फूट उंचीवरून खाली पडला. हवेची दिशा अचानक बदलल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.
जवानाच्या पायाला दुखापत झाल्याचे संरक्षण खात्याचे जनसंपर्क अधिकारी आणि विंग कमांडर अभिषेक मतामेन यांनी सांगितल्याचे वृत्तात म्हटले आहे.  परंतु हा मोठा अपघात नव्हता असेही ते म्हणाले. जवानाची स्थिती गंभीर नसल्याचेही ते म्हटले. जवान जमिनीवर पडताच त्याला लगेचच उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले.